परभणी : पाचही उमेदवारांचे अर्ज पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:45 AM2018-05-05T00:45:45+5:302018-05-05T00:45:45+5:30
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात ३ मे रोजी दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी केलेल्या छाननीत पात्र ठरले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात ३ मे रोजी दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी केलेल्या छाननीत पात्र ठरले आहेत़
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत ३ मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती़ त्यानुसार गुरुवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांकडून माजी आ़ सुरेश देशमुख, शिवसेना-भाजपा युतीकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला़ याशिवाय सुशीलकुमार सुरेशराव देशमुख, सुरेश कुंडलिकराव नागरे, डॉ़ प्रफुल्ल श्रीकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले़ दाखल अर्जांची शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी केली़ त्यामध्ये पाचही उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत़ आता ७ मे पर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत़
भाजपाच्या निर्णयाकडे लागले लक्ष
या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची राज्यस्तरावरून युती झाली आहे़ त्यानुसार शिवसेनेचे अकोल्याचे आ़ गोपीकिशन बाजोरिया यांचे पूत्र विप्लव बाजोरिया यांनी युतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़ असे असताना भाजपाचे सुरेश नागरे व प्रफुल्ल पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ सोमवारपर्यंत हे दोन उमेदवार अर्ज परत घेऊन युती अखंडीत ठेवतात की अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात कायम राहतात? याकडे परभणी व हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़