परभणीत अवैध बांधकाम प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:03 PM2019-03-07T18:03:37+5:302019-03-07T18:05:00+5:30
दोघांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
परभणी- शहरात महानगरपालिकेची परवानगी न घेता अवैध बांधकाम केल्या प्रकरणी दोघांवर गुरुवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरातील कच्छी बाजार व गांधी पार्क या भागांमध्ये महानगरपालिकेची परवानगी न घेताच परस्पर अवैधरित्या बांधकाम केल्या प्रकरणी मनपाच्या वतीने हनुमानदास द्वारकादास सोनी व तान्हाजी गोपाळराव शहाणे या दोघांना बांधकाम पाडण्यासंदर्भात नोटिसा देण्यात आल्या होत्या; परंतु, त्यांनी सदरील अवैध बांधकाम पाडले नाही़ त्यामुळे त्यांच्याविरोधात मनपातील स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मल्लेश कुऱ्हा यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यावरून पोलिसांनी हनुमानदास सोनी व तान्हाजी शहाणे यांच्याविरूद्ध नगररचना अधिनियम ५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णकांत सरोदे हे करीत आहेत़