परभणीत २ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:45 PM2019-03-11T23:45:26+5:302019-03-11T23:45:55+5:30
शहरातील एकबाल नगर भागात एका चारचाकी वाहनातून सुमारे २ लाख रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० मार्च रोजी रात्री पकडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :शहरातील एकबाल नगर भागात एका चारचाकी वाहनातून सुमारे २ लाख रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने १० मार्च रोजी रात्री पकडला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या विरोधात स्थानिक गुन्हा शाखेने एक पथक नियुक्त केले आहे. एकबालनगर भागातील पाडेला फंक्शन हॉल परिसरात हे पथक गस्त घालत असताना एक कार वेगाने जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या पथकाने कारचा पाठलाग असता चालकाने एकबालनगर भागातील मोहम्मद उमर हाजी यांच्या घरासमोर गाडी उभा करुन तेथून पळ काढाला. या पथकाने गाडीची विचारपूस केली असता मोहम्मद उमर हाजी व चालक दोघेही त्या ठिकाणाहून पळून गेल्याने निदर्शनास आले. त्यानंतर या गाडीची झडती घेतली असता गोवा गुटख्याचे १४ पोते आढळून आले.
या पोत्यांमध्ये गुटख्याचे ७९८ पॉकेट होते. २ लाख ७ हजार ४८० रुपये किंमतीचा गुटखा आणि ३ लाख रुपये किंमतीची एम.एच.०५-डी.डब्ल्यू. २६७९ क्रमांकाची कार असा ५ लाख ७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सहाय्यक उपनिरीक्षक यावर, अफसर, हवालदार मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, लक्ष्मीकांत धुतराज, पोलीस नाईक हुसेन खान, गौस खान पठाण, भगवान भुसारे, हरि खुपसे, यशवंत वाघमारे यांच्या पथकाने केली.