परभणी : हजारोंच्या उपस्थितीत नृसिंह जन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:45 AM2018-04-29T00:45:20+5:302018-04-29T00:45:20+5:30
टाळमृदंगाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण आणि नरहरी श्यामराज की जय, असा जयघोष करीत शनिवारी श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत नृसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोखर्णी नृ. (परभणी) : टाळमृदंगाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलालांची उधळण आणि नरहरी श्यामराज की जय, असा जयघोष करीत शनिवारी श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत नृसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
शनिवारी सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी १० वाजता प.पू.श्री.श्री. १००८ हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांची भागवत कथा झाली. दुपारी ४ वाजता ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे देवजन्माचे कीर्तन झाले. याच कीर्तनात ६.४१ वाजता गुलालाची उधळण करीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर श्रींचा रुद्राभिषेक, वसंत पूजा आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पोखर्णीत दाखल झाले होते. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. २९ एप्रिल रोजी सकाळी १० ते १ या वेळेत भागवत कथेचा समारोप होणार आहे. रात्री ९ वाजता श्रींची ग्रामप्रदक्षिणेसाठी पालखी मिरवणूक निघणार आहे. ३० एप्रिल रोजी वेदांताचार्य प्रल्हादशास्त्री दैठणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.