परभणी: सेलूत घराला तर बोरीत उभ्या पिकाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:55 PM2019-03-28T23:55:39+5:302019-03-28T23:55:56+5:30
सेलू येथे एका घराला तर जिंंतूर तालुक्यातील बोरी येथे ज्वारीच्या पिकाला आग लागून नुकसान झाल्याच्या दोन घटना २८ मार्च रोजी घडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू / बोरी (परभणी): सेलू येथे एका घराला तर जिंंतूर तालुक्यातील बोरी येथे ज्वारीच्या पिकाला आग लागून नुकसान झाल्याच्या दोन घटना २८ मार्च रोजी घडल्या.
सेलू शहरातील सुरज मोहल्ला भागातील ज्ञानेश्वर संतराम पानझाडे यांच्या घराला गुरुवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत घरातील अन्न-धान्य, ठिबक सिंचनचे पाईप, शेती औजारे आणि कापूस जळून खाक झाला. नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या आगीमुळे १ लाख ९० हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दुसरी घटना बोरी येथे घडली. बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस गट नं. १९६ मधील श्रीधर विश्वनाथराव चौधरी यांच्या ज्वारीच्या पिकाला आग लागून सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन एकरातील ज्वारी काढणीला आली होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास आग लागल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली; परंतु, तोपर्यंत मोठे नुकसान झाले. तलाठी नितीन बुड्डे यांनी पंचनामा केला. यावेळी शेतकरी श्रीधर चौधरी, अलीम खान पठाण यांची उपस्थिती होती. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट झाले नाही. चौधरी यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
पाथरीत साहित्य जळून खाक
४माजलगाव रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयाच्या स्टोअर रुमला आग लागून सीडीएम मशिन व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच भिंतीला तडे गेले आहेत. २७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास स्टोअररूमच्या खोलीतून धूर निघत असल्याचे वॉचमन जरीन यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. अग्निशमनचे आरेफ खान, खुर्रम खान, निखिलेश वाडकर, बळीराम गवळी यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली; परंतु, तोपर्यंत भंगार साहित्य जळूून खाक झाल्याची माहिती कनिष्ठ दूर संचार अधिकारी अमिन सिद्दीकी यांनी दिली. या प्र्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.