परभणी : विषय समित्यांचे सभापती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:47 AM2020-01-31T00:47:31+5:302020-01-31T00:47:48+5:30
येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह ६ विषय समित्या व तीन प्रभाग समितींच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे गुरुवारी निश्चित झाले असून या संदर्भातील घोषणेची औपचारिकता १ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह ६ विषय समित्या व तीन प्रभाग समितींच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे गुरुवारी निश्चित झाले असून या संदर्भातील घोषणेची औपचारिकता १ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह ६ विषय समित्या व तीन प्रभाग समितींच्या निवडणुकीची प्रक्रिया २९ जानेवारीपासून सुरु झाली. यासाठी २९ व ३० जानेवारी असे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेळ देण्यात आला होता. २९ जानेवारी रोजी एकही अर्ज मनपाकडे आला नाही; परंतु, ३० जानेवारी रोजी स्थायी समिती सभापतीपदासाठी गुलमीर खाँ कलिंदर खाँ यांचा अर्ज दाखल झाला तर प्रभाग समिती ‘अ’ सभापतीपदासाठी राधिका शिवाजी गोमचाळे, प्रभाग समिती ‘ब’ साठी सय्यद समरीन बेगम फारुख व प्रभाग समिती ‘क’ साठी नम्रता संदीप हिवाळे यांचे अर्ज दाखल झाले. दलितवस्ती निर्मूलन, घर बांधणी व समाजकल्याण सभापतीपदासाठी नागेश सोनपसारे यांचा अर्ज दाखल झाला. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी माधुरी विशाल बुधवंत यांचा तर स्थापत्य समितीसाठी गवळणताई रामचंद्र रोडे यांचा अर्ज दाखल झाला. वैद्यकीय व सहाय्य आरोग्य समितीच्या सभापतीसाठी अब्दुल कलीम अ.समद यांचा तर विधी समिती समितीसाठी अॅड.अमोल पाथरीकर आणि शहर सुधार समितीसाठी शेख फरहत सुलताना शेख अ.मुजाहेद यांचा अर्ज दाखल झाला. माध्यमिक व पूर्व माध्यमिक आणि तांत्रिक समिती सभापतीपदासाठी विकास लंगोटे यांचा अर्ज दाखल झाला. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, रविंद्र सोनकांबळे, सचिन देशमुख, अमोल पाथरीकर, नागेश सोनपसारे, गणेश देशमुख, इम्रान हुसैनी, फारुखबाबा, मुजाहेद शेख, बाळासाहेब बुलबुले, मो.नईम, विश्वजीत बुधवंत, अमोल जाधव आदींची उपस्थिती होती.
राष्टÑवादी सत्तेत अन् विरोधी पक्षातही
४महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. गेल्यावेळी काँग्रेसला विरोध करुन राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेतले होते. त्यानंतरच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस मनपाच्या सत्तेत सहभागी झाला.
४आता सभापतीपदासाठीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. एकीकडे सत्तेतील सभापतीपदे या पक्षाने मिळविली असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदही याच पक्षाकडे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेप्रमाणे महानगरपालिकेतही विरोधी पक्ष राहिलेला नाही.
भाजपाची चुप्पी कायम
४जिल्हा परिषदेत भाजपाचे ५ सदस्य असताना त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीच्या वेळी चुप्पी कायम ठेवून एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना समर्थन दिले होते. महानगरपालिकेतही भाजपाची चुप्पी कायम दिसून आली.
४सभागृहात पक्षाचे ८ सदस्य असताना व काँग्रेस- राष्ट्रवादी हे सत्तेत असताना विरोधी पक्षनेतेपदावरही भाजपा दावा करु शकत नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.