परभणी : चक्का जाम, अर्धजलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:32 AM2018-07-31T00:32:04+5:302018-07-31T00:34:13+5:30
मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी ३० जुलै रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. पूर्णा तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पाथरी तालुक्यामध्ये ढालेगाव बंधाऱ्यात उतरुन अर्धजलसमाधी आंदोलन करीत समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी लावून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी ३० जुलै रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. पूर्णा तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पाथरी तालुक्यामध्ये ढालेगाव बंधाऱ्यात उतरुन अर्धजलसमाधी आंदोलन करीत समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी लावून धरली.
जिल्ह्यामध्ये एक आठवड्यापासून आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन सुरु आहे. सकल मराठा समाज आंदोलनात उतरला असून ठिकठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने होत आहेत. पूर्णा तालुक्यात सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ग्रामीण भागात चुडावा, माटेगाव, आहेरवाडी येथे हे आंदोलन झाले.
चुडावा येथे सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलन केल्याने पूर्णा-नांदेड राज्य रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. माटेगाव येथेही आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवून धरला.
पूर्णा-झिरोफाटा या मार्गावरील वाहतूक आंदोलनामुळे विस्कळीत झाली होती. आहेरवाडी फाटा येथे आंदोलन करण्यात आले. माटेगाव येथेही आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून शासनाचा निषेध नोंदविला. तसेच चक्काजाम आंदोलन केले.
बोरीत मूक मोर्चा
बोरी- सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सकल मराठा समाज बांधवांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला. प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या मोर्चात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहाय्यक निरीक्षक व्यंकटेश आलेवार, उपनिरीक्षक व्ही.एस.खोले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. विद्याताई चौधरी, आशाताई गायकवाड, मुंजाभाऊ मगर, उत्तम डोंबे, तानाजी चौधरी, कांता चौधरी, अशोकराव खापरे, शिवाजी कदम, नवनाथ कदम, राजाभाऊ देशमुख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेलूत बेमुदत ठिय्या आंदोलन
सेलू येथे मराठा समाज बांधवांनी ३० जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. येथील तहसील कार्यालयासमोर सुरु केलेल्या या आंदोलनात पहिल्या दिवशी कुंडी व म्हाळसापूर येथील मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदविला. ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
पोखर्णी रोडवर रास्ता रोको
मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील समाज बांधवांनी पाथरी- पोखर्णी रस्त्यावर सोमवारी सकाळी ९ वाजता रास्तारोको आंदोलन केले. मंडळ अधिकारी पंडित सुरवसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक एस.व्ही. मनाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.एम.शेख, वाहुळे, जाधव आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पूर्णा वकील संघाचा पाठिंबा
मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनास पुर्णा येथील वकील संघाने पाठिंबा दिला असून आरक्षणासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष जी.एन.डाखोरे, पी.एस.सोनी, आर.के. देवकते, गोविंद शिंदे, कैलास पारवे, दिनेश काळे, राजू भालेराव, सोमनाथ नागठाणे आदींची नावे आहेत.
पाथरी- तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीपात्रात उतरुन सोमवारी मराठा समाज बांधवांनी दोन तास अर्धजलसमाधी आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
तालुक्यात १९ जूनपासून सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन केले जात आहे. आंदोलनाचा आजचा ११ वा दिवस आहे. ३० जुलै रोजी मराठा समाजाच्या वतीने ढालेगाव येथील गोदावरी नदीपात्रात अर्धजलसमाधी आंदोलन करण्यात आले.
सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पाथरी शहरापासून ढालेगावपर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. समाज बांधवांनी गोदावरी नदीपात्रात उतरुन घोषणा दिल्या. एक ते दीड तास हे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार एस.डी. मांडवगडे यांनी गोदावरी नदीपात्रात उतरुन निवेदन स्वीकारले. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.