परभणी : एकाच टँकरवर पाण्यासाठी चाटोरीकरांची मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:57 AM2019-03-30T00:57:16+5:302019-03-30T00:57:24+5:30
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाटोरी या गावासाठी पाण्याचे एकच टँकर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून आणखी एक टँकर वाढून देण्याकडे उपविभागीय अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.
तालुक्यातील चाटोरी हे गाव ६ हजार लोकसंख्येचे आहे. तालुक्यातील पहिला टँकर चाटोरी गावाला सुरू झालेला आहे. गावाजवळील नदी कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपातळी खालावल्याने शेतशिवारातील विंधन विहिरी व हातपंप कोरडे पडले आहेत. रात्र जागून पाण्यासाठी चाटोरीकरांचे हाल होत आहेत. प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी एक टँकर सुरू केले आहे. या टँकरची क्षमता कमी असून गावाला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच टँकरला पाण्यासाठी रावराजूर येथे जावे लागते. एका दिवसात केवळ दोन फेऱ्या होत आहेत. यातून जेमतेम २० हजार लिटर पाणी मिळत आहे. गावाला किमान दररोज १ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी गोंधळ निर्माण होत आहे. त्या अगोदर चार-चार तास हंड्यांच्या रांगा लावून ठेवाव्या लागत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. दोन कि.मी. पायपीट करून घागरभर पाण्यासाठी कसरती करावी लागत आहे.
नवीन टँकरची मागणी करूनही दुर्लक्ष
४चाटोरी गावची लोकसंख्या मोठी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शासनाने टँकर दिले आहे. मात्र या टँकरवर गावाची तहान भागत नाही. पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. अजून एक टँकर देण्यात यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे; परंतु, अधिकारी व कर्मचारी या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. नवीन टँकर सुरू करण्यासाठी आचारसंहितेचे कारण सांगून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तत्काळ टँकर मंजूर न केल्यास या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा चाटोरी येथील सरपंच गंगाधर मस्के यांनी दिला आहे.