परभणी : तलाठ्यास चापट मारून वाहनचालक फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:50 AM2019-02-25T00:50:02+5:302019-02-25T00:50:18+5:30
तालुक्यातील पिंपरी शिवारात जप्त केलेल्या वाळू साठ्यातून वाळूची चोरी करताना पकडलेल्या वाहनाच्या मालकाने तलाठ्याला चापट मारुन त्या ठिकाणाहून पळ काढल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात वाहनचालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यातील पिंपरी शिवारात जप्त केलेल्या वाळू साठ्यातून वाळूची चोरी करताना पकडलेल्या वाहनाच्या मालकाने तलाठ्याला चापट मारुन त्या ठिकाणाहून पळ काढल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात वाहनचालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीतून वाळूचा बेसुमार उपसा होत असल्यासंदर्भात २३ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा खणीकर्म अधिकारी विद्या खरवडकर यांनी शनिवारी पिंपरी येथील गोदावरी नदीपात्रास भेट दिली. तसेच ६० ते ७० ब्रास वाळूचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या या वाळूची देखरेख करण्याची जबाबदारी तलाठी चंद्रकांत साळवे यांच्याकडे दिली होती. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास या वाळू साठ्यातून एक हायवा ट्रक वाळू भरुन नेत असल्याचे तलाठी साळवे व तलाठी अक्षय नेमाडे यांना दिसले. तलाठी आल्याचे लक्षात येताच एम.एच.४५- १२६७ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने तेथून पळ काढला. तलाठी साळवे व नेमाडे यांनी या ट्रकचा पाठलाग करुन पिंपरी शिवारातील कचरा डेपोजवळ ट्रक थांबविला. चालक हनिफ पठाण याच्याकडून चावी ताब्यात घेतली. तेव्हा दुचाकीवरुन तेथे आलेल्या ट्रक मालक माधव साहेबराव शिंदे (रा.मसला) याने ट्रक का थांबविला, अशी विचारणा करुन तलाठी साळवे याच्यासोबत वाद घातला. त्यांना धक्का-बुक्की करुन त्यांच्या खिशातील ट्रकची चावी काढून घेतली. यावेळी शिंदे यांनी साळवे यांना चापटाने मारहाण केली. याचवेळी नायब तहसीलदार किरण नारखेडे, मंडळ अधिकारी शंकरराव राठोड, तलाठी शिवाजीराव मुरकुटे हे घटनास्थळी पोहचले. माधव शिंदे व हनिफ पठाण यांना ताब्यात घेऊन गंगाखेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. या प्रकरणी तलाठी साळवे यांच्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे तपास करीत आहेत.
अवैध वाळू वाहतूक करणारे चार वाहने पकडली
४पूर्णा- तालुक्यातील कान्हडखेड शिवारात अवैध वाळू उपसा करण्याच्या उद्देशाने उभे असलेले चार ट्रॅक्टर उपविभागीय अधिकाऱ्यांनी २४ फेब्रुवारी रोजी जप्त केले. कान्हडखेड शिवारातील पूर्णा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय अधिकारी विश्वांभर गावंडे यांनी रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कान्हडखेड येथे भेट दिली होती.
४ यावेळी पूर्णा नदीच्या पात्र परिसरात उभे असलेले चार ट्रॅक्टर त्यांनी जप्त केले. हे चारही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले आहेत.