परभणी : पक्षी, झाडांच्या संवर्धनासाठी सरसावले पांगरीतील चिमुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:48 PM2019-04-27T23:48:44+5:302019-04-27T23:49:10+5:30
जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात दोन वर्षापूर्वी लावलेल्या ४० ते ५० झाडांचे दुष्काळी परिस्थितीत संवर्धन व्हावे, यासाठी या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रयत्न सुरू केले आहेत़ झाडांच्या बुडाला टाकाऊ बाटल्यांच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ विद्यार्थ्यांचा हा उपक्रम पर्यावरण प्रेमींसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात दोन वर्षापूर्वी लावलेल्या ४० ते ५० झाडांचे दुष्काळी परिस्थितीत संवर्धन व्हावे, यासाठी या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रयत्न सुरू केले आहेत़ झाडांच्या बुडाला टाकाऊ बाटल्यांच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ विद्यार्थ्यांचा हा उपक्रम पर्यावरण प्रेमींसाठी प्रेरणा देणारा ठरत आहे़
पांगरी येथील जि़प़ शाळेत दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात़ त्यातूनच दोन वर्षांपूर्वी शाळेच्या आवारात फुले आणि फळांची सुमारे ५० झाडे लावण्यात आली़ सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ही झाडे पाण्याअभावी कोमेजू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला आहे़ दररोजच्या जेवणाच्या डब्यासोबत आणलेले पाणी शिल्लक राहिल्यानंतर झाडांना दिले जाते़ याशिवाय प्रत्येक झाडाच्या बुडाला बाटली लावून त्यात सुतळी सोडून थेंब थेब पाणी देण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला आहे़ शाळेच्या परिसरातील प्रत्येक झाडाला बाटलीच्या सहाय्याने पाणी दिले जात आहे़ झाडे जगविण्याचा विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे़ दुष्काळी परिस्थितीत अनेक भाग पाण्याअभावी ओसाड पडलेला दिसत असला तरी जि़प़ शाळेचा परिसर मात्र आजही हिरवागार दिसत आहे़ शाळेच्या आवारात बऱ्यापैकी झाडी झाली असून, फुलझाडांनी हा परिसर शोभीवंत झाला आहे़
विशेष म्हणजे केवळ झाडांना पाणी देण्यापर्यंतच विद्यार्थी थांबले नाहीत तर या झाडांवर येणाºया पक्षांचीही चिंता विद्यार्थ्यांना लागली होती़ त्यातूनच जुन्या मोठ्या झाडांवर पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा करण्यात आली आहे़ प्रत्येक झाडावर टोपली वजा शिंकाडे बांधून पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा विद्यार्थ्यांनी केली आहे़ शाळेचे मुख्याध्यापक के़सी़ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मंडळीही या कामी मुलांना प्रोत्साहन देत आहे़
एक हजार झाडांची रोपवाटिका
आगामी काळात वृक्षारोपण करण्यासाठी विद्यार्थी आतापासूनच कामाला लागले आहेत़ बोर, सिताफळ, लिंबोळी आदी झाडांच्या बियांपासून एक हजार रोपे तयार केली जात आहेत़ परिसरातील मैनापुरी डोंगर आणि इतर ठिकाणी ही झाडे लावली जाणार आहेत़ एक मुल ३० झाड हे अभियान सुरू केले असल्याची माहिती मुख्याध्यापक के़सी़ घुगे यांनी दिली़