परभणी : सेलूत विद्यार्थिनींनी दिला रोडरोमिओंना चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:16 AM2018-09-29T00:16:27+5:302018-09-29T00:18:36+5:30
शालेय विद्यार्थिनींचा पाठलाग करुन त्यांना नाव विचारणाऱ्या दोन रोडरोमिओंना मुलींनी बसस्थानकात चप्पलाने चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड वाजता बसस्थानक परिसरात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): शालेय विद्यार्थिनींचा पाठलाग करुन त्यांना नाव विचारणाऱ्या दोन रोडरोमिओंना मुलींनी बसस्थानकात चप्पलाने चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीड वाजता बसस्थानक परिसरात घडला.
ग्रामीण भागातील शेकडो मुली बसने शिक्षणासाठी सेलू शहरातील शाळा, महाविद्यालयांत येतात. शुक्रवारी दुपारी शाळेतून बसस्थानकाकडे येत असताना पारीख कॉलनीतील हरिओम हॉस्पिटलपासून दोन रोडरोमिओंनी मुलींचा पाठलाग करीत त्यांना नाव सांगा, असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. बºयाच दिवसांपासून हे दोन रोडरोमियो मुलींना परेशान करीत होते. मात्र मुलींनी भीतीपोटी कोणालाही सांगितले नाही. शुक्रवारी दुपारीही पुन्हा हे दोन रोडरोमिओ त्रास देत असल्याने मुलींनी तातडीने भीतीपोटी बसस्थानक गाठले. मात्र या रोडरोमिओंनी मुलींचा बसस्थानकापर्यंत पाठलाग करुन हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तुझे नाव कसे सांगत नाहीस, तुला नाव सांगावे लागेल, असे प्रश्न विचारु लागले.
मुुली हा सर्व प्रकार सहन करीत होत्या; परंतु, रोडरोमिओ मुलींवर दबाव आणत होते. त्यामुळे मुलींचा राग अनावर झाला. त्यांनी बसस्थानकात, तुम्हाला आमचे नाव कशासाठी हवे आहे, असा जबाब विचारत रोडरोमिओंना बदडण्यास सुरुवात केली. बसस्थानकात इतर शालेय विद्यार्थिनी व प्रवासी होते. त्यामुुळे घडलेल्या प्रकारामुळे या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली. या विद्यार्थिनींनी एवढ्यावरच न थांबता या रोडरोमियोंना बदडत बदडत पोलिसांच्या स्वाधीन केले.