परभणी मंडळात १४ हजार ७९९ ग्राहकांचे विद्युत मीटर बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 07:34 PM2020-03-04T19:34:03+5:302020-03-04T19:35:38+5:30
महावितरणची मोहीम; ५२ टक्के वीज गळती होत असल्याने निर्णय
परभणी : परभणी मंडळांतर्गत ५२ टक्के वीज गळती होत असल्याने व ग्राहकांना योग्य, अचूक आणि मानवहस्तक्षेप विरहित वीज बिल देण्याच्या अनुषंगाने रेडिओ फ्रीक्वेन्सी डाटा युनिट (आरएफडीसीयू) या प्रणालीवरील वीज मिटर बसविण्याची मोहीम महावितरणच्या वतीने सुरु करण्यात आली असून आतापर्यंत परभणी शहरात १४ हजार ७९९ ग्राहकांचे मीटर बदलण्यात आले आहेत.
वीज गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना अचूक व मानवहस्तक्षेप विरहित वीज बिल देण्याच्या अनुषंगाने महावितरण कंपनीने अत्याधुनिक पद्धतीचे रेडिओ फ्रीक्वेन्सी डाटा युनिट (आरएफडीसीयू) मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या मीटरच्या माध्यमातून डाटा कान्स्ट्रेटर युनिट (डीसीयू) मशीनद्वारे थेट महावितरणच्या संगणकीय बिलिंग प्रणालीमध्ये ग्राहकांच्या मीटरची रिडिंग येते. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात आरएपीडीआरटी टाऊन मधील नांदेड परिमंडळातील २ लाख ५३ हजार ग्राहकांचे मीटर बदलण्याचे उद्दिष्ट महावितरणच्या वतीने ठेवण्यजात आले आहे. त्यानुसार राणीपूर (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील मे.जिनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हे मीटर बदलण्याचे काम देण्यात आले आहे.
या अंतर्गत परभणी शहरात ५२ टक्के वीज गळती असल्याने ही वीज गळती कमी करण्याच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेडिओ फ्रीक्वेन्सी डाटा युनिट (आरएफडीसीयू) मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे ग्राहकास त्याच्या वीज वापराप्रमाणे अचूक युनिटचे बिल देणे शक्य होणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. शहरात आॅगस्ट २०१९ पासून मीटर बदलण्याचे काम सुरु करण्यात आले असून या अंतर्गत ५२ हजार ३३९ ग्राहकांचे मीटर बदलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी जानेवारी २०२० पर्यंत निवडलेल्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून १४ हजार ७९९ ग्राहकांचे मीटर बदलण्यात आले असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.
ग्राहकांना मिळते मोफत मीटर
महावितरणच्या वतीने ग्राहकांना जे नवीन मिटर देण्यात येत आहे़ ते पूर्णत: मोफत आहे़. असे असतानाही काही ठिकाणी ग्राहकांकडून वीज मिटर बदलण्यासाठी पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या़ या तक्रारींच्या अनुषंगाने स्थानिक कार्यालयाकडून कारवाई झालेली नाही, अशी लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. असे असताना महावितरणच्या वतीने मात्र सर्व काही सुरळीत असल्याचे सांगण्यात आले़ योग्य, अचूक व मानव हस्तक्षेप विरहित वीज बिल येण्याच्या अनुषंगाने महावितरणकडून रेडिओ फ्रीक्वेन्सी डाटा युनिट (आरएफडीसीयू) मीटर बसविण्यात येत आहेत. हे मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना जादा वीज देयके आकारण्यात आलेली नाहीत. तसेच मीटर बदलण्यास वीज ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचा विरोध झालेला नाही, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.
माहिती देण्यास अधिकाऱ्यांचा नकार
ग्राहकांना बदलून देण्यात येणारे मिटर पूर्णत: मोफत आहेत का? असा प्रश्न महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांना रात्री ७़४५ च्या सुमारास भ्रमणध्वनीद्वारे विचारला असता, त्यांनी रात्री ८ वाजले आहेत, असे म्हणून फोन बंद केला़ त्यामुळे महावितरणची या संदर्भातील अधिकृत भूमिका समजू शकली नाही़ शिवाय महावितरणच्या हितार्थ माहिती देण्याबाबत अन्नछत्रे यांची उदासिनता दिसून आली़