परभणी: रस्त्यासाठी नागरिकांचा मनपात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:31 AM2019-08-10T00:31:26+5:302019-08-10T00:31:33+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी जवळपास साडेतीन तास मनपात ठिय्या आंदोलन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या आश्नासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी जवळपास साडेतीन तास मनपात ठिय्या आंदोलन केले. महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या आश्नासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
परभणी शहरातील शाहूनगर, सावित्रीबाई फुलेनगर, लक्ष्मीनगर, भारत नगर, नेहरु नगर आदी भागात कच्चे रस्ते आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणे कठीण झाले आहे. महानगरपालिकेचे या भागाकडे दुर्लक्ष असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी दुपारी १ वाजता मनपा कार्यालय गाठले. जोपर्यंत येथील रस्त्याचा प्रश्न सोडविला जात नाही, तोपर्यंत मनपातच बसून राहण्याचा निर्णय या नागरिकांनी घेतला. मनपा आयुक्त रमेश पवार हे विभागीय आयुक्तांच्या बैठकीत असल्याने ते चर्चेला आले नाहीत. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास महापौर मीनाताई वरपूडकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी बोलताना नगरसेविका डॉ.वर्षा खिल्लारे यांनी सांगितले की, सदरील जागा मनपाच्या ताब्यात नसल्याने त्या ठिकाणी मनपाचा निधी खर्च करता येत नाही; परंतु, या भागातील लोकवस्तीपाहता व रस्त्यांची स्थिती पाहता मनपाच्या स्व: उत्पन्नातून विशेष निधी देऊन येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती केली. त्यानंतर महापौरांनी येथील रस्त्याचा प्रश्न सोडविला जाईल, असे लेखी आश्वासन नागरिकांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सचिन खरात, सूमन उफाडे, सूमन गाडे, सोनाली काचगुंडे, सोजरबाई हजारे, शांताबाई तुपसमिंद्रे, सुरेखा खरात, वंदना वाहुळे, लताबाई नंद, दराडे, झोडपे आदींनी सहभाग नोंदविला.