परभणी शहर:११ हजार खांबावर एलईडी दिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:42 AM2018-10-29T00:42:48+5:302018-10-29T00:44:01+5:30
शहरातील वीज खांबावर एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट एका एजन्सीने घेतले असून येत्या दोन महिन्यामध्ये ११ हजार ३०० खांबावर दिवे बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: शहरातील वीज खांबावर एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट एका एजन्सीने घेतले असून येत्या दोन महिन्यामध्ये ११ हजार ३०० खांबावर दिवे बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
परभणी शहरातील वीज खांबावरील जुने दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शहर महापालिकेने राज्य शासनाच्या एका एजन्सी समवेत नुकताच या संदर्भातील करार केला असून या एजन्सीमार्फत शहरातील पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
विशेष म्हणजे एलईडी पथदिवे बसविण्याबरोबरच पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही एजन्सीवर असल्याने महापालिकेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. परभणी शहरात ११ हजार ३०० विद्युत खांब असून या सर्व खांबावर एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच परभणी शहर एलईडी दिव्यांनी उजळणार आहे. विशेष म्हणजे, हे दिवे बंद आणि सुरु करण्यासाठी प्रत्येक खांबावर टायमर बसविले जाणार असून यातून विजेची मोठ्या प्रमाणात बचतही होणार आहे.
महापौरांच्या हस्ते उद्घाटन
४वीज खांबावर एलईडी दिवे बसविण्याच्या या कामाचे उद्घाटन नुकतेच महापौर मीनाताई वरपूडकर, सभागृहनेते भगवान वाघमारे यांच्या हस्ते झाले. दर्गारोडवरील हजरत सय्यद शाह तुराबूल हक दर्गा कमानीजवळ महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते विजय जामकर, नगरसेवक गुलमीर खान, विकास लंगोटे, अॅड.अमोल पाथरीकर, विशाल बुधवंत, मोईन मौलवी, अॅड. विष्णू नवले, मो. नईम, यांत्रिकी विभागाचे तन्वीर मिर्झा बेग, पाशा कुरेशी, रितेश जैन आदींची उपस्थिती होती. महापालिकेतील विद्युत विभागाचे ३० कर्मचारी यासाठी प्रयत्न करीत असून विद्युत विभाग व एजन्सी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येत्या दोन महिन्यामध्ये सर्व पथदिवे बदलले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.