परभणी शहर मनपा: विकासकामांसह प्रशासनही ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:16 AM2018-05-20T00:16:18+5:302018-05-20T00:16:18+5:30
मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी परभणी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती झाली नसल्याने मनपाचा कारभार ढेपाळला आहे. शहर स्वच्छतेबरोबरच पाणीप्रश्न आणि प्रशासकीय समस्या वाढत चालल्या असून नागरिकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी परभणी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती झाली नसल्याने मनपाचा कारभार ढेपाळला आहे. शहर स्वच्छतेबरोबरच पाणीप्रश्न आणि प्रशासकीय समस्या वाढत चालल्या असून नागरिकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
परभणी महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांची २१ एप्रिल रोजी पदोन्नतीवर धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. आयुक्त राहुल रेखावार यांनी त्यांच्या कार्यकाळात परभणी महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावली होती. या शिस्तीतच शहरातील विविध विकासकामे पार पडत होती. रेखावार यांची बदली झाल्यानंतर परभणी शहराला नवीन आयुक्त लवकरच आयुक्त रुजू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांच्या बदलीला एक महिना झाला. अद्यापही नवीन अधिकारी मनपाला मिळाले नाहीत. सध्या आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे आहे. परंतु, या महिनाभराच्या काळात महापालिकेचा कारभार संपूर्णत: विस्कळीत झाला आहे. शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून या समस्यांचा वेळीच निपटारा होत नसल्याने नागरिकांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील स्वच्छता आणि पाण्याचा प्रश्न या प्रमुख समस्या निर्माण झाल्या आहेत. स्वच्छता अभियानाच्या काळात तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनी महापालिकेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना नियोजनबद्ध कामांचे वितरण केले होते. परिणामी दररोज शहरात नियमित स्वच्छता होत होती. नाल्यांची सफाई, कचºयाची विल्हेवाट आदी कामे रोजच्या रोज होत असल्याने शहर स्वच्छतेत भर पडली होती.
सध्या मात्र ही कामे विस्कळीत झाली आहेत. प्रमुख रस्त्यांची स्वच्छता वगळता वसाहतीमधील स्वच्छतेसाठी कर्मचारी फिरकत नाहीत. नाल्यांची सफाई होत नाही. १५ दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. परंतु, मोठ्या नाल्यांची सफाईची मोहीम अजूनही हाती घेण्यात आली नाही. दुसरीकडे पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र झाला असून शहरातील अनेक प्रभागांमध्ये १२ दिवसांतून एक वेळा पाणी येत आहे. शहरासाठी मूबलक पाणी उपलब्ध असतानाही केवळ नियोजन नसल्याने नागरिकांना पाणीटंचाई सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेचा टंचाई कृती आराखडाही पडून आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असतानाही टँकर सुरु झाले नाहीत. परिणामी शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या दोन प्रमुख प्रश्नांबरोबरच फेरफार, बांधकाम परवाना, हस्तांतरण ही प्रमाणपत्रेही उपलब्ध होत नाहीत. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने या समस्या निर्माण झाल्या असून परभणी महापालिकेसाठी तातडीने पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
महिनाभरात विभागप्रमुखांची बैठकच झाली नाही
मनपा आयुक्तांचा पदभार जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे आहे. मात्र एक महिन्याच्या काळात जिल्हाधिकारी पी. शिव शंकर हे एकवेळाही मनपात आले नाहीत. पूर्वी प्रत्येक आठवड्याला विभागप्रमुखांच्या बैठका घेतल्या जात होत्या. या बैठकांमध्ये शहर विकासाच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय होत होते. तसेच अधिकाºयांना योग्य त्या सूचनाही दिल्या जात होत्या. मात्र महिनाभरापासून विभागप्रमुखांच्या बैठकाही झाल्या नाहीत. आयुक्त नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर नियंत्रण राहिले नसून महापालिकेमध्ये अधिकारी, कर्मचारी जागेवर उपलब्ध नसतात. परिणामी नागरिकांची कामे खोळंबत आहेत. तसेच शहरवासियांच्या दृष्टीने महत्त्वांच्या फाईलींवर निर्णय होत नसल्याने या फाईली रखडल्या आहेत. मनपा कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन फाईल्स् सादर करीत आहेत. या एक महिन्याच्या काळात एकही धोरणात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे मनपाचा कारभार सध्या तरी ढेपाळल्याचे दिसत आहे.
कर्मचाºयांचे पगार रखडले
महापालिकेतील कर्मचाºयांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. दोन दिवसांपूर्वी कंत्राटी कामगारांनी पगारासाठी आंदोलन केल्याने या कामगारांचा दोन महिन्यांचा पगार अदा करण्यात आला. परंतु, उर्वरित कर्मचाºयांचे पगार रखडले असून त्यांचे पगार करण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांमध्येही उदासीनता निर्माण झाली आहे. महिनाभरापूर्वी घरपट्टी आणि नळपट्टी वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविली होती. आयुक्तांच्या बदलीनंतर ही मोहीमही ठप्प पडली असून महापालिकेला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.