परभणी शहर : १५ दिवसांनी मिळते पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:08 AM2018-06-13T00:08:54+5:302018-06-13T00:08:54+5:30
शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली असून १५ दिवसांतून एकवेळ पाणी मिळत असल्याने शहरवासियांना सध्या कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना १५ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये शहरवासियांना १० दिवसाआड पाणी मिळत होते. पावसाळा सुरु झाल्यानंतर पाणीटंचाई कमी होण्याऐवजी वाढली आहे.
शहरवासियांना १५ दिवसांपर्यंत पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी ओरड वाढत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांची बदली झाल्यानंतर मनपाचा कारभार ढिसाळ झाला आहे. शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. चार दिवसांपूर्वी राहटी बंधाºयातून पाणी उपसा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या एक्सप्रेस फिडरवरील विद्युत रोहित्र जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा आणखीच विस्कळीत झाला होता. हे विद्युत रोहित्र दुरुस्त करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. विद्युत रोहित्र दुरुस्त होऊन पाण्याचा उपसा सुरु झाला असला तरी अनेक प्रभागांना १५-१५ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठीची ओरड वाढत आहे. केवळ नियोजनाचा अभाव असल्यामुळेच शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
महानगरपालिका प्रशासनाने पाणी वितरणाचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
परभणीसाठी मूबलक पाणी
शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात शहरासाठी पाणी आरक्षित करण्यात आले असून बंधाºयातील पाणीसाठा संपल्यास निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घेतले जात आहे. मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा करण्याचे नियोजन विस्कळीत झाल्यानेच शहरवासियांना १५ दिवसांतून एकवेळ पाणी उपलब्ध होत आहे. मनपाने पाणी सोडण्याचे नियोजन करुन किमान चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
नव्या आयुक्तांसमोर आव्हाने
४परभणी महानगरपालिकेसाठी आयुक्त म्हणून रमेश पवार यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन आयुक्त रुजू होतील. शहरातील स्वच्छतेबरोबरच नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आव्हान नवीन आयुक्तांसमोर असणार आहे. ते या समस्या कशा पद्धतीने हाताळतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
जलवाहिनीला गळती
शहरात जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती आहे. वर्षभरापासून दुरुस्तीची कामे झाली नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय गळतीमुळे टेलपर्यंत पाणी पोहचण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत.
विजेच्या कमी दाबामुळे वाढले रोटेशन
राहटी येथील विद्युत रोहित्रावर वीज पडल्याने तो जळाला होता. त्यानंतर ग्रामीण भागातून वीज जोडणी घेतली आहे. परंतु, आवश्यक तेवढ्या दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा १४ ते १५ दिवसाआड होण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने पत्रक काढून कळविले.