परभणी : नाट्यगृहाच्या कामासाठी आचारसंहितेचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:10 AM2018-05-08T00:10:26+5:302018-05-08T00:10:26+5:30
येथील नाट्यगृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला ६ कोटी रुपयांचा निधी आचारसंहिता संपल्यानंतरच उपलब्ध होणार असल्याने नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु होण्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट पहावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील नाट्यगृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेला ६ कोटी रुपयांचा निधी आचारसंहिता संपल्यानंतरच उपलब्ध होणार असल्याने नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु होण्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट पहावी लागणार आहे.
परभणी शहरातील नटराज रंगमंदिर या जुन्या नाट्यगृहाची दूरवस्था झाल्याने नवीन नाट्यगृह उभारणीसाठी आ.डॉ.राहुल पाटील यांनी शासन दरबारी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे राज्य शासनाने नाट्यगृह उभारणीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून महानगरपालिकेला हा निधी प्राप्त झाला आहे. येथील बचतभवनच्या जागेत नाट्यगृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महानगरपालिकेने नाट्यगृह उभारण्याची प्रक्रिया सुरु केली. प्रारंभी नाट्यगृहाचा आराखडा तयार करुन बांधकामाचा खर्च काढण्यात आला. एकूण १६ कोटी रुपयांचा आराखडा तयार झाला असून राज्य शासनाकडून १० कोेटी रुपयेच प्राप्त झाले आहेत. हे नाट्यगृह उभारणीसाठी आणखी ६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाच्याच मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत ६ कोटी रुपये नाट्यगृहासाठी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, सध्या परभणी जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे ही आचारसंहिता संपेपर्यंत निधी मिळणे शक्य नसल्याने परभणीकरांना २१ मे पर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर या संदर्भातील हालचाली होतील.
नाट्यगृहासाठीचा आराखडा तयार झाला आहे. तसेच नांदेड येथील बांधकाम विभागाची तांत्रिक मान्यता मिळाली असून विद्युत विभागाची मान्यता घेण्यासाठी हा प्रस्ताव औरंगाबाद येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या आठ दिवसांत विद्युत विभागाची तांत्रिक मान्यता मिळेल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. दोन्ही विभागांच्या तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे मनपाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
इमारत पाडण्याची मागितली परवानगी
नाट्यगृह उभारणीसाठी निश्चित केलेल्या जागेवर बचतभवनची जुनी इमारत उभी आहे. नाट्यगृह बांधकामासाठी ही जागा मोकळी करावी लागणार असल्याने जुनी इमारत पाडणे आवश्यक आहे. त्यामुळे मनपाने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे ही इमारत पाडण्यासाठी परवानगी मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार मनपा कर्मचारी किंवा कंत्राट काढून इमारत पाडण्याचे काम केले जाईल, असेही मनपातील सूत्रांनी सांगितले.