परभणी पुन्हा गारठली; तापमान ६.४ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:37 PM2019-01-08T12:37:08+5:302019-01-08T12:38:36+5:30
थंड वारे वहात असल्याने झोंबणारी थंडी जाणवत होती.
परभणी : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची लाट आली असून, मंगळवारी जिल्ह्याचा पारा ६.४ अंशापर्यंत उतरल्याने संपूर्ण जिल्हा गारठला आहे.
यावर्षी जिल्ह्यात थंडीचे प्रमाण अधिक राहिले आहे. दोन आठवड्यापूर्वी तर जिल्ह्यात पंधरा वर्षांतील विक्रमी ३ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर संपूर्ण आठवडाभरा तापमानात घट होत राहिली. मागील आठवड्यात मात्र तापमनात वाढ झाल्याने जिल्हावासियांना थंडीपासून सुटकारा मिळाला होता. मात्र मंगळवारी पुन्हा तापमनात घट झाली. विशेष सोमवारी १४ अंशावर असणारे किमान तापमान मंगळवारी मात्र ६.४ अंशापर्यंत घसरल्याने अचानक थंडीत मोठी वाढ झाली आहे. सकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला होता. थंड वारे वहात असल्याने झोंबणारी थंडी जाणवत होती.
उत्तरेकडील वाऱ्याचा परिणाम
जिल्हयात सध्या उत्तरेकडून पूर्वेकडे वारे वहात आहेत. या वाऱ्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या थंड वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे डॉ. के. के. डाखोरे यांनी सांगितले.