परभणी : दिवाळी सुट्यांबाबत शिक्षण विभागातच संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:48 PM2019-10-19T23:48:07+5:302019-10-19T23:49:38+5:30
आगामी दिवाळीच्या सुट्यांबाबत शिक्षण विभागातच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वेगवेगळे पत्रके काढून शिक्षकांना सुट्यांची माहिती दिल्याने नेमक्या दिवाळीच्या सुट्या किती तारखेपर्यंत असा प्रश्न आता शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आगामी दिवाळीच्या सुट्यांबाबत शिक्षण विभागातच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वेगवेगळे पत्रके काढून शिक्षकांना सुट्यांची माहिती दिल्याने नेमक्या दिवाळीच्या सुट्या किती तारखेपर्यंत असा प्रश्न आता शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.
यावर्षी दिवाळी सणापूर्वीच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून, २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात विधानसभेचे मतदान होत आहे. मात्र त्यामुळे दिवाळी सुट्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने काढलेल्या पत्रानुसार २४ आॅक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या राहतील आणि १४ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक सत्राला सुरुवात होईल, असे पत्र काढले आहे. सर्व मुख्याध्यापक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.
दुसरीकडे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिवाळी सुट्यांसंदर्भात काढलेल्या पत्रात २१ आॅक्टोबरपासून ते ९ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या राहतील आणि ११ नोव्हेंबरपासून शाळा पूर्ववत सुरू होतील, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्या ११ नोव्हेंबरपर्यंत की १४ नोव्हेंबरपर्यंत असा संभ्रम निर्माण झाला आहे.
दोन्ही विभागाचे दोन वेगवेगळे पत्र काढण्यात आल्याने दिवाळीच्या सुट्यांबद्दल शिक्षण विभागातच संभ्रमाचे वातावरण असल्याचेही समोर आले आहे.
निवडणुकीमुळे संभ्रम
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ आॅक्टोबर रोजी असल्याने २१ आॅक्टोबरपूर्वी दिवाळीच्या सुट्या की मतमोजणी झाल्यानंतर या विषयी संभ्रम असल्याने दोन्ही विभागांनी वेगवेगळे पत्र काढून सुट्यांची माहिती दिली़ दोन्ही पत्रातील भिन्न माहितीमुळे शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे़
नेमक्या सुट्या कधीपासून
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू असून, २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने २४ आॅक्टोबरपासून दिवाळी सुट्या राहतील, असा बदल केला आहे. मात्र प्राथमिक शिक्षण विभागाने २१ आॅक्टोबरपासून म्हणजे मतदान झाल्यानंतरच दिवाळीच्या सुट्या लागू होतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमक्या सुट्या कधीपासून? असा सवाल उपस्थित होत आहे.