परभणी:अर्धवट वर्गखोल्यांचे बांधकाम धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:07 AM2019-03-14T00:07:50+5:302019-03-14T00:07:58+5:30
तालुक्यातील खळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अर्धवट स्थितीत बांधण्यात आलेल्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने या धोकादायक वर्गखोल्या तात्काळ जमीनदोस्त कराव्यात, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील खळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अर्धवट स्थितीत बांधण्यात आलेल्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने या धोकादायक वर्गखोल्या तात्काळ जमीनदोस्त कराव्यात, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
तालुक्यातील खळी गावामध्ये हनुमान मंदिराजवळ असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्थलांतर करण्यासाठी गौंडगाव रस्त्यालगत २००७-०८ साली शाळेच्या नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले. हे काम २००९ मध्ये पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा हलविण्यात आली होती. शाळा स्थलांतर करताना शाळेच्या पाठीमागील बाजूस स्वयंपाक घर व वर्गखोलीचे बांधकाम अर्धवट स्थितीत राहिले होते. शाळेचे स्थलांतर झाल्याच्या काही महिन्यातच या अर्धवट बांधकामावरील एका खोलीच्या खिडकीची तंडी कोसळून एका विद्यार्थ्याला आपला एक हात कायमचा गमवावा लागला होता. ही घटना घडल्यापासून हे काम आहे त्या स्थितीतच पडून राहिल्याने वर्गखोल्यांसाठी टाकलेल्या तंड्यांचा साचा सद्य स्थितीत जीर्ण होऊन केव्हाही कोसळेल, या अवस्थेत आहे. विशेष म्हणजे शाळेच्या मध्यंतरात या अर्धवट बांधकाम परिसरात विद्यार्थी लघुशंका तसेच खेळण्यासाठी जात असल्याने येथील बांधकाम केव्हाही कोसळुन विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी अर्धवट स्थितीत असलेले व विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणारे हे बांधकाम पूर्ण करावे किंवा पाडावे, अशी मागणी होत आहे.
प्रस्ताव शिक्षण विभागाकडे
खळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या अर्धवट असलेल्या शाळा खोल्यांचे जीर्ण झालेले बांधकाम पाडून टाकण्याची मागणी पालक वगार्तून होत आहे. गटशिक्षण अधिकारी यांच्या सुचनेनुसार शाळेला भेट देऊन अर्धवट स्थितीतील धोकादायक झालेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर हे बांधकाम पाडण्यासाठीचा प्रस्ताव मुख्याध्यापकांकडून मागवून घेत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती गटसाधन केंद्रातील अभियंता भोंबडे यांनी दिली.