परभणी : ‘पाटबंधारे’च्या काम वाटपावरून कंत्राटदारांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:39 PM2018-03-06T23:39:38+5:302018-03-07T11:48:23+5:30
येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत येणा-या चा-या दुरुस्तीची कामे मजूर सहकारी सोसायट्यांना वाटप करीत असताना शासकीय नियम डावलले गेल्याच्या कारणावरून सोमवारी जायकवाडी वसाहत भागात कंत्राटदारांनी एकच गोंधळ केला़ त्यानंतर याबाबत थेट जिल्हाधिका-यांकडेही तक्रार करण्यात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत येणा-या चा-या दुरुस्तीची कामे मजूर सहकारी सोसायट्यांना वाटप करीत असताना शासकीय नियम डावलले गेल्याच्या कारणावरून सोमवारी जायकवाडी वसाहत भागात कंत्राटदारांनी एकच गोंधळ केला़ त्यानंतर याबाबत थेट जिल्हाधिका-यांकडेही तक्रार करण्यात आली़
शहरातील देशमुख हॉटेल परिसरातील जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यालय सातत्याने वादाचा विषय बनले आहे़ या कार्यालयातील विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी त्यांच्याच कार्यालयातील कर्मचा-यांनी आंदोलन केले होते़ आता सलगरकर यांनी काम वाटपात सर्व नियम ढाब्यावर बसविल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत़ जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत येणाºया माखणी, बेलखेडा, दहेगाव, रामपुरी, हमदापूर, भारस्वाडा, इंदेवाडी, टाकळगाव, वझूर, ब्रह्मपुरी, दैठणा, धानोरा, पेडगाव, आंबेगाव, लिंबा, चिंचोली, येलदरी आदी गाव शिवारातील वितरिका आणि लघु वितरिकांची दुरुस्ती, मुख्य कालवा दुरुस्ती, फरशी दुरुस्ती, साचलेला गाळ, गवत काढणे, कॅनॉलच्या साईडने मुरूम टाकून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे़
तब्बल ४ कोटी ४ लाख ८७ हजार रुपयांच्या ३९ कामांचे सलगरकर यांनी मजूर सहकारी संस्थांना वाटप केले़ शासन निर्णयानुसार कामाचे वाटप करीत असताना ३३ टक्के कामे मजूर सहकारी सोसायट्यांना, ३३ टक्के कामे सुशिक्षीत बेरोजगार संघटना यांना व ३४ टक्के कामे खुल्या निविदा प्रक्रियेंतर्गत देणे आवश्यक आहे़ परंतु, कार्यकारी अभियंता सलगरकर यांनी सर्व शासनाचे नियम पायदळी तुडवित मजूर सहकारी सोसायट्यांनाच सर्वच्या सर्व कामे वाटप केल्याच्या इतर कंत्राटदारांनी तक्रारी केल्या़ त्यानुसार सोमवारी दुपारी २ च्या सुमारास या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कंत्राटदार व राजकीय नेते उपस्थित झाले़
त्यावेळी कार्यकारी अभियंता सलगरकर कार्यालयात उपस्थित नव्हते़ शिवाय त्यांचा मोबाईलही बंद होता़ त्यामुळे कंत्राटदारांनी एकच गोंधळ केला़ काहींनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली; परंतु, तेथेही ते उपस्थित नव्हते़
त्यामुळे काही कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी प़ शिव शंकर यांची भेट घेतली व त्यांच्या कानावर हा प्रकार घातला़ त्यानंतर जिल्हाधिका-यांनी कार्यकारी अभियंता सलगरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु, त्यांचा मोबाईल बंद होता़ त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी बीडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले़ यावेळी बीडकर यांनी कार्यालयात येऊन या संदर्भातील कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले़ त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी या संदर्भात पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधून त्यांच्या कानी हा प्रकार घातला़ त्यानंतर कंत्राटदार निघून गेले़
दरम्यान, सलगरकर यांच्या या निर्णयाविषयी विविध राजकीय पक्षाचे नेते व कंत्राटदारांनी संताप व्यक्त केला़ त्यांचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू असतो़ शासनाचे नियम डावलून ते निर्णय घेत आहेत़ त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी यानिमित्ताने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे़
सलगरकर यांच्याविषयी यापूर्वीही तक्रारी
जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्याविषयी यापूर्वीही त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांनीच तक्रारी केल्या आहेत़ विशेष म्हणजे या कर्मचा-यांनी सलगरकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात आरोप करून काम बंद आंदोलनही केले होते़ आता कंत्राटदारांनीही शासनाचे नियम डावलून कामाचे सलगरकर यांनी वाटप केल्याचा आरोप केला आहे़ या संदर्भात प्रतिक्रियेसाठी सलगरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता़