परभणी : तोडणी यंत्रणेवरील नियंत्रण झाले सैल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:08 AM2019-01-30T00:08:32+5:302019-01-30T00:08:43+5:30
उसाची तोडणी आणि वाहतुकीसाठी राबविल्या जाणाऱ्या यंत्रणेवर रेणुका शुगर प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याने ठरवून दिलेल्या आराखड्यानुसार ऊस गाळप होत नाही. या प्रकारात तोडणी यंत्रणेकडून उत्पादकांची लूट होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): उसाची तोडणी आणि वाहतुकीसाठी राबविल्या जाणाऱ्या यंत्रणेवर रेणुका शुगर प्रशासनाचे नियंत्रण राहिले नसल्याने ठरवून दिलेल्या आराखड्यानुसार ऊस गाळप होत नाही. या प्रकारात तोडणी यंत्रणेकडून उत्पादकांची लूट होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
पाथरी येथील गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २००८ मध्ये रत्नप्रभा परभणी यांना चालविण्यासाठी दिला होता. त्यानंतर या भागात रेणुका शुगर्स मार्फत हा कारखाना चालविला जात आहे. सध्या या भागामध्ये लिंबा येथील योगेश्वरी शुगर हा कारखानाही कार्यरत आहे. दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८ ते १० लाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध आहे.
पाथरी येथील रेणुका शुगर कारखान्याचा गाळप हंगाम अडीच महिन्यांपूर्वी सुरु झाला. सध्या तोडणीचा कार्यक्रम विस्कळीत झाला आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात लागवड केलेला ऊस अजूनही गाळप झालेला नाही. तर डिसेंबर महिन्यात लागवड केलेला ऊस गाळपाला जात आहे. ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यावर दररोज चकरा मारत आहेत. तोडणी प्रोग्राम आल्यानंतरही ऊस गाळप होत नसल्याने शेतकरी तोडणी यंत्रणेकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र आर्थिक व्यवहार केल्याशिवाय ऊस तोडणी होत नसल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या आहेत. एक एकर ऊस तोडण्यासाठी ५ ते १० हजार रुपयापर्यंत पैसे मोजावे लागत असल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे शेतकरी सध्या त्रस्त आहेत.