परभणी :मोफत प्रवेशाला थंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:25 AM2018-02-18T00:25:34+5:302018-02-18T00:25:40+5:30
बालकांच्या मोफत शिक्षण कायद्या अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे़ ही प्रक्रिया सुरू होवून आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी केवळ ३३६ आॅनलाईन अर्जच दाखल झाले आहेत़ त्यामुळे याही वर्षी जागा रिक्त राहतात की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बालकांच्या मोफत शिक्षण कायद्या अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे़ ही प्रक्रिया सुरू होवून आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी केवळ ३३६ आॅनलाईन अर्जच दाखल झाले आहेत़ त्यामुळे याही वर्षी जागा रिक्त राहतात की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़
दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो़ यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये १० फेब्रुवारीपासून आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे़ या प्रवेशासाठी जिल्ह्यातील १५२ शाळांची निवड करण्यात आली आहे़ या १५२ शाळांमध्ये १ हजार ५०२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ या शाळांमधील जिंतूर तालुक्यातील १४ शाळांमध्ये ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ सोनपेठ तालुक्यात ११ शाळांमध्ये १५७, परभणी ग्रामीण भागातील १६ शाळांमध्ये १८४ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ मानवत तालुक्यातील ९ शाळांमध्ये प्राथमिकच्या ५० विद्यार्थ्यांना तर पूर्व प्राथमिकच्या २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ तर पालम तालुक्यात ६ शाळांमध्ये ६६, पूर्णा तालुक्यातील १४ शाळांमध्ये ७४ तर सेलू तालुक्यामध्ये १३ शाळांमधील प्राथमिकच्या १३३ विद्यार्थ्यांना तर पूर्व प्राथमिकच्या १३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. पाथरी तालुक्यातील ४ शाळांमध्ये प्राथमिकचे ३८ तर पूर्व प्राथमिकच्या १० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ परभणी शहरामध्ये ४४ शाळा असून, यामध्ये ३६२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे़ प्रवेश प्रक्रिया सुरू होवून आठ दिवसांचा कालावधी उलटत आला असून, आणखी एकच आठवडा आॅनलाईन नोंदणीसाठी आहे़ यातील निम्मा कालावधी उलटला असून, आतापर्यंत जिल्हाभरात ३३६ पालकांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे़ त्यामुळे सध्या तरी २५ टक्के प्रवेशासाठी थंड प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे़