परभणी : तुती लागवडीचे १२८ हजेरी पत्रक पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:21 AM2018-10-19T00:21:12+5:302018-10-19T00:22:17+5:30
महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या तुती लागवड कामावरील चार गावातील मजुरांचे १२८ हजेरीपत्रक कालावधी संपला तरी एमआयएस झाले नाही. त्यामुळे मजुरांमध्ये जिल्हा रेशीम कार्यालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी) : महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या तुती लागवड कामावरील चार गावातील मजुरांचे १२८ हजेरीपत्रक कालावधी संपला तरी एमआयएस झाले नाही. त्यामुळे मजुरांमध्ये जिल्हा रेशीम कार्यालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने २०१६ पासून राज्यात मनरेगा योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत रेशीम उद्योग तुती लागवड कार्यक्रमास मंजुरी दिली आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी या कार्र्यान्वित यंत्रणेमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. शासनाने मनरेगा योजनेत प्रती लाभार्थी शेतकऱ्यांना २ लाख ९५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक लाभार्थी शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. पूर्णा तालुक्यात मागील काही वर्षापासून रेशीम उद्योग तेजीत आहे. राज्य शासनाने मनरेगा योजनेत तुतीचा समावेश केल्यापासून शेतकºयांची संख्या वाढली आहे. २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात पूर्णा तालुक्यात मंजूर असलेली कामे सुरू आहेत. तहसील कार्यालयातून काढण्यात आलेल्या १२८ ई-मस्टरचा कालावधी ७ आॅक्टोबर रोजी समाप्त झाला आहे. असे असताना कामांच्या मजुरांचे ई-मस्टर एमआयएसवरून अदगाई करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाकडून तहसील कार्यालयात दाखल झाले नाहीत. याबाबत होत असलेल्या दिरंगाईचा दोन दिवसात खुलासा करावा, अशी नोटीस तहसीलदारांंंनी जिल्हा रेशीम अधिकाºयांना काढली आहे.
मंगळवार नावालाच
हिंगोली येथील जिल्हा रेशीम अधिकारी यांच्याकडे सध्या परभणी कार्यालयाचा पदभार आहे. दर मंगळवारी परभणी कार्यालयात त्यांची भेट असते. मात्र एकदा मंगळवार चुकला की ते येत नसल्याने फाईलींचा ढिगारा साचतो. दोन आठवड्यापासून ते कार्यालयात आले नसल्याने सर्व कामे खोळंबली आहेत.
या गावांचा समावेश
महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्णा तालुक्यात सुरू असलेल्या तुती लागवड कामांपैकी १२८ ई-मस्टर प्रलंबित आहेत. यामध्ये वझूर ५९, ताडकळस ६, देऊळगाव दुधाटे ३२ व देवठाणा येथील ३१ कामांचा समावेश आहे.