परभणी : वाळू चोरी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:42 AM2018-11-20T00:42:16+5:302018-11-20T00:43:43+5:30
अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- शहरातील पारवा गेट परिसरात एक टिप्पर (क्रमांक एम.एच.१८-ए.ए.१४६८) वाळू घेऊन जात असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांच्या निदर्शनास आले. सुरेश दळवे हे १९ नोेव्हेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास गस्त घालत असताना त्यांना हा टिप्पर दिसला. यावेळी त्यांनी टिप्पर चालकाला थांबवून वाळू उपशाच्या रॉयल्टीची पावती मागितली असता चालकाकडे पावती आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी वाळूने भरलेला हा टिप्पर कोतवाली पोलीस ठाण्यात आणून लावला.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक फोलाने यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक आरेफ अब्दुल पठाण व मालक शेख सिराज यांच्याविरुद्ध वाळूची चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गुलाब राठोड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
परभणी जिल्ह्यात एकाही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसताना वाळुचा सर्रास अवैध उपसा होत आहे. बाजारपेठेत चढ्या दराने वाळुची विक्री होत असून महसूल प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.