परभणी : १३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:58 PM2018-10-03T23:58:12+5:302018-10-04T00:00:15+5:30
गत दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने मानवत तालुक्यातील कोल्हा महसूल मंडळातील खरिपामधील १३ हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात ७० टक्के घट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ताडबोरगाव (जि. परभणी): गत दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने मानवत तालुक्यातील कोल्हा महसूल मंडळातील खरिपामधील १३ हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात ७० टक्के घट होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
मानवत तालुक्यातील कोल्हा महसूल मंडळातील कोल्हा, सोमठाणा, आरोळा, इरळद, सावंगी, टाकळी निलवर्ण, पार्डी, शेवडी जहागिर, गोगलगाव, कोथाळा, नरळद, राजूरा, मंगरुळ, करंजी, खरबा, ताडबोरगाव, कोल्हावाडी, सावरगाव व देवलगाव अवचार या १९ गावांत यावर्षीच्या खरीप हंगामात १३ हजार २८ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी जून महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसावर पेरणी केली. यामध्ये ६ हजार ६३६ हेक्टर क्षेत्रावर कापूस, ४ हजार ५८० हेक्टरवर सोयाबीन तर ६७७ हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली. उर्वरित क्षेत्रावर मूग व उडीदाची शेतकºयांनी पेरणी केली होती; परंतु पावसाने कोल्हा महसूल मंडळात जून व जुलै या महिन्यात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे या मंडळातील पिके चांगली बहरली होती; परंतु त्यानंतर २० व २१ आॅगस्ट रोजीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती़
तब्बल दीड महिन्यापासून पावसाने कोल्हा महसूल मंडळात हजेरी लावलेली नाही. परिणामी पिके बहरत असताना पावसाने दडी मारल्याने कापसाचे पाते गळून पडली आहेत तर सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. त्यामुळे या पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
काही ठिकाणी सोयाबीन काढणीस सुरुवात झाली असून एकेरी दोन ते तीन पोत्यांचा उतारा येत असल्याचे चित्र सध्या कोल्हा महसूल मंडळात दिसून येत आहे.
यामुळे मंडळातील १९ गावांतील शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकºयांचे आर्थिक गणित कोलमडणार
शेतकºयांचे नगदी पिक म्हणून या भागात कापूस व सोयाबीन पिकाची ओळख आहे. शेतकºयांचे वर्षभरातील आर्थिक गणित या पिकातून निघालेल्या उत्पादनावर अवलंबून असते. मृग नक्षत्रात झालेली पेर व सुरुवातीला जोमात असलेली पिके पाहून शेतकºयांनी पिकांतून जास्तीचे उत्पादन मिळावे, यासाठी औषधी व खतांवर मोठा खर्च केला; परंतु ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने पिकांचा खर्चही निघतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
४या पावसाळ्यात सुरुवातीपासून अत्यल्प पाऊस झाल्याने नदी, नाले भरुन वाहिली नाहीत. त्यामुळे बोअर, विहीर यांची पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. त्याचबरोबर खरीप हंगाम हातचा गेला आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने जमिनीत ओलच राहिली नाही. आता रबी पेरणीही संकटात सापडली आहे. परतीचा पाऊस झालाच तरच रबी पेरणी होणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
शेतकºयांचं पांढरं सोनं काळवंडल
पालम : तालुक्यात यावर्षी सुरुवातीला पाऊस झाल्याने कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर पुन्हा पावसाचा खंड पडल्याने विविध रोगांचा हल्ला पिकावर झाला आहे. यामुळे शेतकºयांचं पांढरे सोनं काळवंडल आहे. त्यामुळे कापूस पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालम तालुक्यात यावर्षी १२ हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. मागीलवर्षी बोंडअळीने कापूस पीक शेतकºयांच्या हातून हिरावून घेतले गेले. यावर्षी बोंडअळीची धास्ती घेत शेतकºयांनी कापसाची लागवड केली आहे. बियाणाचा दर्जा कसाही असो जोखीम घेत पिकांवर हजारो रुपयांचा खर्च केला आहे. सुरुवातीला जोरदार पाऊस पडल्याने कापूस पिकावर मर रोगाची लागण झाली. नंतर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यातच पांढरी माशी, तुडतुडे, लाल्या या सारखे रोग आल्याने कापूस पीक बहरलेच नाही. बोंडांची संख्या कमी झाली आहे. त्याचा शेतकºयांना फटका बसण्याची शक्यता आहे.
कापसाला केवळ दहा-पंधरा बोंडे लागली असून पावसाअभावी ते परिपक्व होण्याच्या अगोदरच उन्हामुळे फुटत आहेत. त्यामुळे पिकांवर केलेला हजारो रुपयांचा खर्चही निघणे अवघड झाले आहे.
- शेख रियाज शेख जमीर (शेतकरी)
एक एकरवरील सोयाबीनची काढणी केली आहे. त्यात केवळ अडीच क्विंटल सोयाबीनचा उतारा मिळाला आहे. त्यामुुळे या उत्पादनातून वर्षाचे आर्थिक नियोजन कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सुनील गुगाने (शेतकरी)