परभणी :विधान परिषदेच्या रिंगणात करोडपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:42 AM2018-05-06T00:42:57+5:302018-05-06T00:42:57+5:30
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत उतरलेले पाचही उमेदवार करोडपती आहेत़ निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करताना या उमेदवारांनी आपली संपत्ती घोषित केली असून, या कोट्याधीश उमेदवारांच्या लढतीकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत उतरलेले पाचही उमेदवार करोडपती आहेत़ निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करताना या उमेदवारांनी आपली संपत्ती घोषित केली असून, या कोट्याधीश उमेदवारांच्या लढतीकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे़
विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक संस्था मतदार संघातून एक सदस्य निवडून द्यावयाचा आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसकडून सुरेश देशमुख, शिवसेना-भाजप युतीकडून विप्लव बाजेरिया या उमेदवारांसह सुशिल देशमुख, भाजपाचे डॉ.प्रफुल्ल पाटील आणि सुरेश नागरे या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवारांना शपथपत्राद्वारे आपली मालमत्ता घोषित करणे बंधनकारक असते. या पाचही उमेदवारांनी स्वत:ची मालमत्ता जाहीर केली आहे़ शिवसेनेचे विप्लव बाजोरिया हे सर्वात श्रीमंत उमेदवार असून, त्यांच्याकडे १९ कोटी ८६ लाख रुपयांची संपत्ती आहे़ तर भाजपाचे डॉ़प्रफुल्ल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनी १७ कोटी २८ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे़ तर अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांच्याकडे ११ कोटी ३० लाख, सुशील देशमुख यांच्याकडे ११ कोटी २७ लाख तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांच्या नावावर ४ कोटी १ लाख रुपये संपत्ती असल्याचे घोषणापत्रात जाहीर केले आहे़
शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजेरिया यांच्याकडे ७ लाख १४ हजार ७६३ रुपयांची रोकड असून त्यांची पत्नी राशी बाजोरिया यांच्या नावावर १ लाख ३० हजार ५६० रुपयांची रोकड आहे़ ५९ लाख २० हजार ६८५ रुपयांच्या विविध बँकांमध्ये ठेवी आहेत़ तसेच ८ कोटी ७ लाख ९५० रुपयांचे शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहेत़ त्याचप्रमाणे २२ लाख ८७ हजार ५६८ रुपयांची वाहने त्यांच्या नावावर आहेत़ त्यात १६ लाख ३ हजार ७५० रुपयांची फॉर्च्युन कार, १८ हजार ८१८ रुपयांची दुचाकी आणि ६ लाख ६५ हजार रुपयांची एक चार चाकी गाडी आहे़ तसेच ५ लाख रुपये किंमतीचे दागिने असून, त्यांच्या पत्नीच्या नावावर १५ लाख २५ हजार रुपयांचे दागिने असल्याचे या शपथपत्रात नमूद केले आहे़ त्याचप्रमाणे ४ कोटी ५० हजार रुपये किंमतीची शेत जमीन आणि ४ कोटी ५७ लाख ५० हजार रुपयांची अकृषिक जमीन त्यांच्या नावावर आहे़ विविध भागात निवासी फ्लॅट व इतर मालमत्ता मिळून १ कोटी ८१ लाख रुपयांची मालमत्ता त्यांच्या नावावर आहे़ एकूण १० कोटी ३९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांनी या शपथपत्रात नमूद केली आहे तर ९ कोटी १८ लाख ७ हजार ६६० रुपयांचे कर्जही त्यांच्या नावावर आहे़ विप्लव बाजोरिया यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून १९ कोटी ९६ लाख ५२ हजार ३१७ रुपयांची मालमत्ता असून, ९ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज आहे़
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख हे देखील कोट्यधीश असून, त्यांनी शपथपत्रामध्ये मागील वर्षीचे उत्पन्न ४९ लाख ९९ हजार ३९० रुपये एवढे दाखविले आहे तर त्यांच्याकडे १३ लाख १९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, ३ कोटी ८८ लाख ५५ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता असून, स्वत: संपादित केलेल्या स्थावर मालमत्तेची किंमत १ कोटी १५ लाख तर वारसातून प्राप्त झालेल्या मालमत्तेची किंमत २ कोटी ७३ लाख ५५ हजार एवढी आहे़
३५ लाख ८७ हजारांचे कर्जही त्यांच्यावर आहे़ सुरेश देशमुख यांनी याच शपथपत्रामध्ये पत्नी विमलताई देशमुख यांच्या नावावर ३ कोटी ७६ लाख ११ हजारांची जंगम मालमत्ता, ९ कोटी ५६ लाख ३५ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आणि खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विकास बांधकामाचा खर्च ५ कोटी १३ लाख २० हजार रुपये एवढा दाखविला आहे़ पत्नीच्या नावावर एकूण ९ कोटी ५६ लाख ३५ हजारांची मालमत्ता संपादित केली असून त्यांच्याच नावावर ६ कोटी ३७ लाख ७८ हजारांचे कर्जही दाखविले आहे़ या निवडणुकीतील युती आणि आघाडीचे उमेदवार कोट्यधीश असल्याचे शपथपत्रावरून दिसून येत आहे़
सुशीलकुमार देशमुख : आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख यांचे सुपूत्र सुशीलकुमार देशमुख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनी शपथपत्रात नमूद केलेली संपत्ती सुमारे ११ कोटी २७ लाख एवढी आहे़ त्यात १० लाख ३८ हजारांचे सोने, ८ लाखांचे वाहने, ७ लाख ९७ हजारांच्या ठेवी, २ कोटी ७६ लाख रुपये शेत जमीन, १ कोटी ९८ लाख रुपयांची बिगर शेती जमीन दाखविली असून, त्यांच्यावर ४ कोटी ४६ लाख २२ हजारांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे़
डॉ़ प्रफुल्ल पाटील : भाजपाचे डॉ़ प्रफुल्ल पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनी देखील शपथपत्रात नमूद केलेली मालमत्ता कोटींच्या घरात आहे़ डॉ़ प्रफुल्ल पाटील यांनी मागील वर्षाचे उत्पन्न ६९ लाख ५७ हजार ८५० रुपये एवढे दाखविले आहे़ त्यांच्या नावावर १० कोटी ९० लाख १६ हजार ४२९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे़ तर २ कोटी ६९ लाख २५ हजार ८८८ रुपयांची स्थावर मालमत्ता त्यांनी स्वत: खरेदी केली आहे़ तसेच पत्नीच्या नावावर ६ कोटी १२ लाख ४८ हजार ७०४ रुपयांची जंगम मालमत्ता दाखविली आहे़ मुलीच्या नावावर ८६ लाख २७ हजार ७६६ तर मुलाच्या नावावर ५१ लाख १४ हजार ६४० रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे़
सुरेश नागरे : या निवडणुकीतील तिसरे अपक्ष उमेदवार सुरेश नागरे हे देखील करोडपती आहेत़ सुरेश नागरे यांनी आपल्या शपथपत्रात ९ लाख ५६ हजार ४०८ रुपये एवढे मागील वर्षीचे उत्पन्न दाखविले आहे़ ९ लाख ६४ हजार २३० रुपयांची जंगम मालमत्ता त्यांच्या नावावर असून, ८ लाख २४ हजार २८५ रुपयांची जंगम मालमत्ता त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे़ नागरे यांच्या नावावर १ लाख ५० हजारांचे दागिने असून, त्यांच्या पत्नीकडे ८ लाख २० हजार ७६० रुपयांचे दागिने आहेत़ तसेच शेत जमीन, बिगर शेतीची जमीन, प्लॉट, निवासस्थाने अशी ८ कोटी ३८ लाख ६० हजार ३५० रुपयांची स्थावर मालमत्ताही त्यांनी या शपथपत्रात नमूद केली आहे़ तसेच स्वत:ची संपादित केलेल्या मालमत्तेची किंमत २ कोटी ३८ लाख एवढी दाखविण्यात आली आहे़ वारसा हक्काने १३ लाख ५६ हजारांची मालमत्ता त्यांना प्राप्त झाली आहे़ विशेष म्हणजे, सुरेश नागरे यांच्यावर कोणतेही कर्ज नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे़