परभणी : पावणेसात कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:27 AM2018-03-25T00:27:58+5:302018-03-25T00:27:58+5:30
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यासाठी ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्या वेतनाचा अनेक महिन्यांपासूनचा प्रश्न निकाली निघणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यासाठी ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्या वेतनाचा अनेक महिन्यांपासूनचा प्रश्न निकाली निघणार आहे़
राज्य शासनाच्या वतीने निराधार लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते़ यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना राबविली जाते़ या योजनेंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना जगण्यासाठी साधन उपलब्ध झाले आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या लाभार्थ्यांची निवड करून त्यांना प्रत्येक महिन्याला अनुदानाचे वितरण करण्यात येते़ मात्र मागील तीन महिन्यांपासून श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी अनुदान उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांचे वेतन रखडले होते़ त्यामुळे या गोरगरीब लाभार्थ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा टाकला होता़
राज्य शासनाने १९ मार्च रोजी एका निर्णयाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेच्या अनुदानासाठी निधी वितरणास मंजुरी दिली आहे़ २०१७-१८ या आर्थिक वर्षातील जानेवारी २०१८ ते मार्च २०१८ या तीन महिन्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे़
याच शासन आदेशानुसार परभणी जिल्ह्यासाठी ६ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपयांचा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे़ हा निधी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्यानंतर त्याचे तालुकानिहाय वितरण केले जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत लाभार्थ्यांचे रखडलेले वेतन होण्याची शक्यता आहे़
वितरणासंदर्भात निर्देश
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अव्वर सचिव ए़ के़ अहिरे यांनी शासन निर्देशानुसार श्रावणबाळ योजनेसाठी अनुदान मंजूर केले आहे़ जिल्हाधिकारी स्तरावर हे अनुदान वितरित होणार असून, जिल्हाधिकाºयांनी प्राप्त झालेले अनुदान तालुक्याच्या आवश्यकतेनुसार वितरित करावे, असे सूचित केले आहे़ वितरित अनुदानापेक्षा अधिकचा खर्च होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे़
३८ हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये ३८ हजार ३६८ लाभार्थ्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जातो़ त्यात ३० हजार २४३ लाभार्थ्यांना प्रतीमहा ४०० रुपये आणि ८ हजार १२५ लाभार्थ्यांना प्रतिमहा ६०० रुपये अनुदान दिले जाते़
या सर्व लाभार्थ्यांच्या अनुदानापोटी प्रत्येक महिन्यात २ कोटी २५ लाख १२ हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे़ परभणी जिल्ह्याला तीन महिन्यांसाठी ६ कोटी ७५ लाखांचे अनुदान वितरणास मंजुरी मिळाली आहे़
जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविलेल्या पात्र लाभार्थी संख्येवर अधारित या निधी वितरणास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नोंदणीकृत लाभार्थ्यांचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला आहे.