परभणी : शिवालयांमध्ये भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:30 AM2019-03-05T00:30:46+5:302019-03-05T00:31:13+5:30
जिल्ह्यातील शिवालयांमध्ये सोमवारी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बम बम भोलेचा गजर करीत अनेक शिवभक्तांनी भक्तीभावे दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील शिवालयांमध्ये सोमवारी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बम बम भोलेचा गजर करीत अनेक शिवभक्तांनी भक्तीभावे दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
परभणी शहरामध्ये महादेव मंदिरात भल्या पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नांदखेडारोडवरील पारदेश्वर मंदिर, बेलेश्वर मंदिरात दिवसभर भाविकांची रिघ पहावयास मिळाली. विशेष म्हणजे महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. शहरामध्ये महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मागील काही दिवसांपासून हरिनाम सप्ताहाचेही आयोजन केले होते. सोमवारी कीर्तन, प्रवचन कार्यक्रमांबरोबरच महादेवाच्या पिंडीस अभिषेकही करण्यात आले. जलाभिषेक, दुग्धाभिषेक करुन भाविकांनी शिवरात्र साजरी केली. महाशिवरात्रीसाठी बेल आणि पुष्पांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. महादेवाच्या पुजेला बेलाचे महत्त्व असल्याने शिवमंदिरासमोर विक्रेत्यांनी स्टॉल लावून बेल-पुष्पांची विक्री केली.
पारदेश्वर मंदिरात उशिरापर्यंत रांगा
४येथील पारदेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७.३० वाजता मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही शोभायात्रा परत मंदिरापर्यंत पोहोचली. त्यानंतर भाविकांनी अभिषेक केले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी उशिरापर्यंत रांगा लावून भाविकांनी दर्शन घेतले.
दामोदर यांचे प्रवचन
४पिंगळी- महाशिवरात्रीनिमित्त पिंगळी बाजार येथे शिवलीलामृत कथेचे प्रवचन झाले. शि.भ.प. शंकर दामोदर यांनी कथेचा अर्थ सांगितला. ज्ञानेश्वर भवर यांनी कथा वाचन केले. तसेच गोकुळनाथ महाराज मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त राम महाराज पिंपळेकर यांचे कीर्तन पार पडले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंभारीतही महाशिवरात्री उत्साहात
४परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार येथे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. येथील महादेव मंदिरात कुंभारीसह परिसरातील गावांमधून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना साबुदाण्याची खिचडी प्रसाद म्हणून देण्यात आली. माजी सरपंच मारोती इक्कर, पांडुरंग जुंबडे, रामा इक्कर, बाळू इक्कर, नवनाथ पिंगळे, विक्रम जुंबडे, रामा जुंबडे, राजू इंगोले, शिवाजी इक्कर, अर्जुन इक्कर, तुकाराम जुंबडे, शिवाजी जुंबडे आदींनी हा उपक्रम राबविला.
रामपुरी येथे यात्रा महोत्सव
४पाथरी- तालुक्यातील रामपुरी खु. येथील गोदावरी नदीकाठावरील रत्नेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा उत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळी नदीपात्रात स्नान करुन भाविकांनी रत्नेश्वराचे दर्शन घेतले.