परभणी : अनाथ बालकांसाठी सायकल मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:48 AM2018-11-24T00:48:59+5:302018-11-24T00:50:09+5:30
एच.आय.व्ही. बाधित अनाथ मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन या विषयावर जनजागृती करण्यासाठी येथील होमिओपॅथीक अकादमी आॅफ रिसर्च अॅण्ड चॅरीटीज् या संस्थेच्या वतीने ८०० कि.मी. अंतराच्या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथून ही मोहीम सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: एच.आय.व्ही. बाधित अनाथ मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन या विषयावर जनजागृती करण्यासाठी येथील होमिओपॅथीक अकादमी आॅफ रिसर्च अॅण्ड चॅरीटीज् या संस्थेच्या वतीने ८०० कि.मी. अंतराच्या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथून ही मोहीम सुरू होणार आहे.
होमिओपॅथीक अकादमीचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी यापूर्वीही अशा प्रकारच्या मोहिमा राबविल्या आहेत. २५ नोव्हेंबर रोजी पुणे रेल्वे स्टेशन येथून या मोहिमेला सुरुवात होणार असून, थेऊर, जेजुरी, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली, रायगड व पुणे या मार्गावर सायकलद्वारे प्रवास केला जाणार आहे. ८०० कि.मी. अंतराचा हा प्रवास पुणे, अहमदनगर, नाशिक, अलीबाग या चार जिल्ह्यातून सह्याद्रीच्या पर्वत रांगातून अवघड असा ताम्हीणी घाट मार्गे सायकलवर केला जाणार असल्याचे डॉ.चांडक यांनी सांगितले.
या प्रवासादरम्यान विविध सामाजिक संस्था, सायकलिंग ग्रुप, रोटरी क्लब, आनंदवन व सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरार्थी आदींच्या वतीने आयोजित केलेल्या जनजागृती कार्यक्रमात डॉ.पवन चांडक मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यात अजूनही एच.आय.व्ही. बाधित बालकांचे शिक्षण व पुनर्वसनाचे प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांवर जनजागृतीची आवश्यकता असल्याने दरवर्षी अशा मोहिमा राबवून जनजागृतीचे काम केले जात असल्याचे डॉ.पवन चांडक यांनी सांगितले.
यापूर्वीही केल्या सायकल मोहिमा
४डॉ.पवन चांडक यांनी यापूर्वी मुंबई ते कोकण (४०० कि.मी.), परभणी ते पणजी (७५० कि.मी.), पंढरपूर (३०० कि.मी.), विदर्भ सायकलवारी (८२० कि.मी.), पुणे- महाबळेश्वर (३८० कि.मी.), सुरत- चित्तोडगड- गुजरात- राजस्थान (८०० कि.मी.), गडचिरोली (२८० कि.मी.), पुणे- पंढरपूर-कुर्डूवाडी (३५० कि.मी.) व बेंगलोर- केरळ-कन्याकुमारी (१ हजार कि.मी) आदी सायकल मोहिमा केल्या आहेत.
४ यावर्षीही ८०० कि.मी. अंतराची सायकल मोहीम आखली आहे. शुक्रवारी डॉ.पवन चांडक परभणी येथून पुणे येथे रवाना झाले. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सायकलिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.