परभणी : डिग्रसचे पाणी पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:18 AM2018-12-23T00:18:03+5:302018-12-23T00:18:24+5:30
गोदावरी नदीच्या पात्रात बांधलेल्या डिग्रस बंधाऱ्यातून शनिवारी सकाळी ६ वाजता नांदेड शहरासाठी २० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला असून, गोदावरी काठाचे वाळवंट झाले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : गोदावरी नदीच्या पात्रात बांधलेल्या डिग्रस बंधाऱ्यातून शनिवारी सकाळी ६ वाजता नांदेड शहरासाठी २० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला असून, गोदावरी काठाचे वाळवंट झाले आहे़
परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे़ संपूर्ण पालम तालुका दुष्काळी म्हणून जाहीरही करण्यात आला़ त्यामुळे तालुक्यात आॅक्टोबर महिन्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे़ अशा परिस्थितीमध्ये तालुक्यातील डिग्रस बंधाºयातील पाणीसाठा तालुकावासियांसाठी आशेचा किरण ठरत होता़ या बंधाºयात ३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्यात आला होता़ यापैकी २५ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते़ २२ डिसेंबर रोजी बंधाºयामध्ये २६ दलघमी पाणीसाठा शिल्लक होता़ या पाणीसाठ्यापैकी २५ दलघमी पाणी नांदेडसाठी सोडावे, अशी मागणी करण्यात आली होती़ मात्र जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी पालम शहर व गोदाकाठावरील गावांतील पिण्याच्या पाण्यासाठी ६ दलघमी पाणी शिल्लक ठेवण्याच्या सूचना दिल्या़ त्यामुळे २६ दलघमी पैकी २० दलघमी पाणी सोडण्यात आले आहे़ २२ डिसेंबर रोजी सकाळी ६़२० वाजता बंधाºयाच्या १६ पैकी ९ दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला़ सकाळी ११़३० वाजेपर्यंत हे पाणी सोडण्यात आले़ बंधाºयातील पाणी नांदेड शहराकडे झेपावले असून, गोदावरी पात्रात आता ६ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़
डिग्रस बंधारा पालम तालुक्यात असून, या बंधाºयातील पाणीसाठ्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे़ परंतु, बंधारा बांधतानाच या बंधाºयातील पाणी नांदेडकरांनी आरक्षित करून ठेवले आहे़ त्यामुळे दरवर्षी याबंधाºयातून पाणी पळविले जाते़ तालुक्यातील शेतकºयांनी आपल्या जमिनी या बंधाºयासाठी देऊन परिसराच्या विकासाला हातभार लावला़ मात्र प्रशासकीय दबावातून बंधाºयातून पाणीसाठा नांदेडसाठी आरक्षित केल्याने या बंधाºयातील पाण्याचा वापर तालुक्यासाठी होत नाही़ दुष्काळी परिस्थिती असतानाही पालम तालुक्यातील ग्रामस्थांच्या पाणीटंचाईचा कोणताही विचार न करता, किंवा स्थानिक शेतकºयांना विचारात न घेता प्रशासनाने बळाचा वापर करून अचानक पाणी सोडले़ परिणामी स्थानिक शेतकºयांना विरोध करण्यासाठीही वाव मिळाला नाही़ अखेर या बंधाºयातील पाणी पळविण्यात नांदेडकरांना यश आले़
साठा असतानाही डिग्रसच्या पाण्यावर डोळा
दरवर्षी नांदेड शहराच्या पाण्यासाठी मार्च महिन्यात डिग्रस बंधाºयातून विष्णूपुरी बंधाºयामध्ये पाणी सोडले जाते़ सद्यस्थितीत विष्णूपुरी बंधाºयामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे़ परंतु, तरीही मार्च महिन्याची प्रतीक्षा न करता डिग्रसच्या पाण्यावर डोळा ठेवून डिसेंबर महिन्यातच बंधाºयातील पाणी पळविण्यात आले़ या धोरणामुळे स्थानिक शेतकºयांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे़ नांदेड शहरासाठी पाणी आरक्षित केले असले तरी ते वेळेपूर्वीच उचलण्यात आल्याने तालुक्यातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़
आरक्षित पाणीही सोडले
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पालम आणि पूर्णा तालुक्यासाठी या बंधाºयात पाणीसाठा आरक्षित केला होता़ परंतु, प्रशासकीय दबावामुळे आरक्षित केलेले पाणीही नांदेडकरांसाठी सोडून दिले़ परिणामी टंचाईच भर पडणार आहे़
प्रशासनाचे दुर्लक्ष
तालुक्यामध्ये जनावरांच्या चाºयासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे़ अशा परिस्थितीत उपलब्ध असलेले पाणी स्थानिकांसाठी वापरणे आवश्यक होते़ परंतु, स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
गाळच शिल्लक
डिग्रस बंधाºयामध्ये असलेल्या २६ दलघमी पैकी २० दलघमी पाणी सोडल्याने कागदोपत्री सहा दलघमी पाणी असल्याचे दाखविले जात आहे़ परंतु, प्रत्यक्षात या बंधाºयात मोठ्या प्रमाणात गाळ असून, पाण्याऐवजी या बंधाºयातच केवळ गाळच शिल्लक राहिला आहे़
अधिकाºयांवर कारवाई करा-रोकडे
डिग्रस बंधाºयातील पाणी सोडण्याची आवश्यकता नसतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती न देता बंधाºयातील पाणी सोडण्यात आले आहे़ पाणी सोडण्यासाठी मदत करणाºया अधिकारी व कर्मचाºयांनी विश्वासघात केल्याचा आरोप भाजपाचे गणेशराव रोकडे यांनी केला आहे़