परभणी : मागणी ३१२ कोटींची; मिळाले ८७.६२ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:12 AM2019-11-20T01:12:01+5:302019-11-20T01:12:53+5:30
जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता राज्य शासनाकडे ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाने केली असताना शासनाने फक्त ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता राज्य शासनाकडे ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांच्या निधीची मागणी प्रशासनाने केली असताना शासनाने फक्त ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित केला आहे. एवढ्या तुटपुंज्या निधीतून ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकऱ्यांना मदत द्यायची कशी, असा सवाल उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकºयांच्या ४ लाख ५६ हजार ९३३.६२ हेक्टरवरील शेतीमधील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ४ लाख ५४ हजार ६९८.३७ हेक्टर जमिनीवरील जिरायत पिकांचा तर १ हजार ७१९.४८ हेक्टर जमिनीवरील बागायत व ५१५.७७ हेक्टर जमिनीवरील फळ पिकांचा समावेश आहे. या संदर्भातील अहवाल राज्य शासनाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात आला होता. त्यानुसार जिरायत पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर या जुन्या दरानुसार ३०९ कोटी १९ लाख ४९ हजार रुपयांची तर बागायत पिकांची २ कोटी ३२ लाख आणि फळ पिकांसाठी ९२ लाख ८३ हजार अशी एकूण ३१२ कोटी ४४ लाख ४५ हजार रुपयांची मागणी शेतकºयांना देण्यात येणाºया मदतीसाठी शासनाकडे करण्यात आली होती. यानुसार जिल्ह्याला मदत मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, ही अपेक्षा फोल ठरताना दिसून येत आहे. १८ नोव्हेंबर रोजी महसूल व वनविभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशात जिल्ह्याला तुटपुंजा निधी देण्यात आला आहे. शेती पिकांसाठी ८ हजार प्रति हेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि बहुवार्षिक पिके (फळबागा) यासाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर दराने २ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्याला ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपये देण्यात आले आहेत. जुन्याच निकषात तब्बल ३१२ कोटी ४४ लाख रुपये जिल्ह्याला हवे असताना नवीन निकषात फक्त ८७ कोटी ६७ लाख रुपयेच देण्यात आल्याने जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७१ शेतकºयांना ही मदत द्यायची कशी, असा सवाल निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमधून संतापाची भावना आहे.
३३ टक्के नुकसान मदतीस पात्र
४या संदर्भात काढण्यात आलेल्या आदेशात शेती व फळ पिकांच्या नुकसानीसाठी मदत देताना ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेलेच शेतकरी अनुज्ञेय राहतील, असे या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ही मदत दिली जाणार आहे. सदरील मदत पात्र लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असून या मदतीमधून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करु नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दुष्काळी सवलती लागू
४अतिवृष्टीने नुकसान झाल्याने काही दुष्काळी सवलती शासनाने लागू केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सूट देण्यात आली असून शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे.
४असे असले तरी विद्यार्थ्यांनी यापूर्वीच परीक्षा शुल्क बºयाच ठिकाणी जमा केले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जमा केलेले शुल्क त्यांना परत द्यावे लागणार आहे. त्या अनुषंगाने शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधून होत आहे.
सर्व तालुक्यांना निधी वितरित
४राज्यशासनाकडून निधी प्राप्त होताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तातडीने हा निधी तालुकास्तरावर वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये परभणी तालुक्याला १५ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये, सेलूला ९ कोटी ८० लाख ३९ हजार रुपये, जिंतूरला १४ कोटी १ लाख ८ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.
४पाथरी तालुक्याला ८ कोटी २० लाख २७ हजार रुपये, मानवतला ७ कोटी १४ लाख ९८ हजार रुपये, सोनपेठ तालुक्याला ५ कोटी ३१ लाख ५८ हजार रुपये, गंगाखेड तालुक्याला ९ कोटी ५३ लाख १५ हजार रुपये, पालम तालुक्याला ८ कोटी ४ लाख ९८ हजार रुपये आणि पूर्णा तालुक्याला ९ कोटी ९० लाख ५० हजार रुपये असे एकूण ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.