परभणी : पोलीस उपअधीक्षकांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:47 PM2018-11-24T23:47:16+5:302018-11-24T23:47:36+5:30
गुरुवारी मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गौतमनगर परिसरात नागरिकांच्या घरात घुसून महिला, वृद्ध, बालकांना मारहाण केली. ही बाब बेकायदेशीर असून उपविभागीय पोलीस अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी २८ नोव्हेंबर रोजी निषेध मूकमोर्चा काढला जाणार असल्याची शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गुरुवारी मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गौतमनगर परिसरात नागरिकांच्या घरात घुसून महिला, वृद्ध, बालकांना मारहाण केली. ही बाब बेकायदेशीर असून उपविभागीय पोलीस अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी २८ नोव्हेंबर रोजी निषेध मूकमोर्चा काढला जाणार असल्याची शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे म्हणाले, गुरुवारी रात्री दोन गटात मारहाणीची घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी गौतनगरातील घराघरात घुसून महिलांना, वृद्ध आणि बालकांनाही मारहाण केली. घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी आमचा विरोध नाही; परंतु, अशा पद्धतीने मारहाण करणे ही बाब निषेधार्ह आहे. अनेकांना झालेल्या घटनेची माहितीही नसताना त्यात गोवण्याचा प्रयत्न झाला. गौतमनगर भागातील पोलिसांची कारवाई चीड आणणारी असून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी यांना निलंबित करावे, त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता गौतमनगर भागातून निषेध मूकमोर्चा काढला जाणार आहे. त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत सर्व आंबेडकरी जनता आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. पोलिसांनी या भागात दहशत निर्माण करण्याचे काम केले. जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्याचे कामही पोलिसांकडून झाल्याचा आरोप करण्यात आला. महिलांनीही त्यांना झालेल्या मारहाणी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस प्रशासन हुकूमशाही पद्धतीने वागत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटून झालेल्या प्रकाराची माहिती दिली जाईल. रिपाइं देखील हा प्रश्न उचलून धरणार असल्याचे रिपाइंचे राज्य संघटक डी.एन. दाभाडे यांनी सांगितले. यावेळी सिद्धार्थ भराडे, भारिपचे डॉ.प्रवीण कनकुटे, एमआयएमचे जाकेर कुरेशी, कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे नागेश सोनपसारे, रिपाइंचे उमेश लहाने, सुधीर कांबळे, रणजीत मकरंद यांनीही पोलिसांच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. कोणतीही घटना झाल्यानंतर जाणीवपूर्वक गौतमनगरला टार्गेट केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. पत्रकार परिषदेस प्रदीप वाव्हुळे, कैलास लहाने, अशिष वाकोडे, सुरेश काळे, संजय भराडे, धीरज कांबळे, संजय लहाने, संपत ननवरे, अमोल गायकवाड आदींची उपस्थिती होती. अरुण लहाने यांनी सूत्रसंचालन केले.