परभणी : पाऊस नसल्याने टँकर सुरू ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:05 AM2019-07-08T00:05:20+5:302019-07-08T00:05:43+5:30
जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): जुलै महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस न पडल्याने पंचायत समितीने उन्हाळ्यात सुरू केलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने आणि भीषण पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली. परिणामी फेब्रुवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके बसू लागले. त्यामुळे अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवावी लागली. सलग ४ वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांंना यंदा उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. अनेक गावातील हातपंप कोरडेठाक पडले. इतर पाण्याचे स्रोत आटले. तसेच पाणीपुरवठा करणाºया विहिरींनी तळ गाठला. त्यामुळे अनेक गावात ग्रामपंचायतीने उपलब्ध पाणी स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला. काही गावातील पाणी स्त्रोत पूर्णपणे आटत गेले. त्यामुळे वालूर, हट्टा, सिमणगाव, गुळखंड, तळतुंबा, नागठाणा, पिंपळगाव गोसावी, पिंपरी या गावांना एप्रिल आणि मे महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. वालूर हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने या ठिकाणी १२ हजार लिटर टँकरच्या ३ तर २४ हजार लिटरच्या ३ खेप, हट्टा, सिमणगाव येथे प्रत्येकी २४ हजार लिटर टँकरची एक, गुळखंड येथे ५ हजार लिटर टँकरच्या २, तळतुंबा येथे १२ हजार लिटरच्या २, नागठाणा येथे २४ हजार लिटरच्या २ खेपा तसेच पिंपळगाव गोसावी, पिंपरी या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु, २४ जूनपर्यंतच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर जुलै महिन्यात टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला; परंतु, जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने हातपंप आणि पाणीपुरवठा करणाºया विहिरींची पाणीपातळी वाढली नाही. त्यामुळे पाणीटंचाई कमी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा या गावांचे टँकर सुरू करावे, अशी शिफारस करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.
टँकर सुरू ठेवा : पाच गावांतून दाखल झाले प्रस्ताव
४अद्यापही पाणी टंचाई दूर न झाल्याने नागठाणा, कुंभारी, तळतुंबा, पिंपळगाव, गोसावी, गुळखंड, पिंपरी या गावात उन्हाळ्यात सुरू असलेले टँकर पुन्हा सुरू ठेवावे, असा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.
४सेलू तालुक्यातील या गाव परिसरात येत्या १५ दिवसांत पाऊस नाही झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस झाला नाही तर पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाला उपाययोजना करावी लागणार आहे.