परभणी : एक लाखाची मागितली खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:46 PM2020-02-24T23:46:56+5:302020-02-24T23:47:14+5:30
खाजगी व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरला धमकावून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): खाजगी व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरला धमकावून एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मानवत येथील संत सावतामाळी चौकाजवळील व्यापारी संकुलात डॉ.भागवत हरिमकर यांचा दवाखाना आहे. सोमवारी दुपारी डॉ.हरिमकर रुग्णांची तपासणी करीत असताना एक महिला व एक पुरुष दवाखान्यात आले. पोट दुखत असल्याने ही महिला दवाखान्यात आली होती. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. त्याचवेळी महिलेसोबत असलेला एकजण मोबाईलवर व्हिडिओ शुटींग करीत असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीस मोबाईल मागितला असता तो देण्यास नकार दिला. त्यानंतर डॉक्टर हरिमकर यांनी औषध विक्रेते माणिक रोडे यांना बोलावून घेतले. महिला व तिच्या साथीदाराला ताब्यात घेतल्यानंतर त्या दोघांनी इतर दोघांनी आपल्याला दवाखान्यात पाठविले असल्याचे सांगितले.
काही वेळातच इतर दोघेही दवाखान्यात आले. ‘तुम्ही बोगस डॉक्टर आहात, पोलीस ठाण्यात तक्रार करतो’ अशी धमकी देऊन त्यांनी डॉ.हरिमकर यांच्याकडे १ लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार सुरु असतानाच दवाखान्याच्या परिसरात असलेल्या शेजाऱ्यांनी त्या चौघांनाही पकडून पोलीस ठाण्यात हजर केले. या प्रकरणी चारही जणांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.