परभणी : हमाल, माथाडींची विविध मागण्यांसाठी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:24 AM2020-02-19T00:24:30+5:302020-02-19T00:25:00+5:30
हमाल, माथाडी कामगारांना पेन्शन व सामाजिक सुरक्षा देणारा केंद्रीय कायदा मंजूर करावा, यासह इतर अनेक मागण्यांसाठी १८ फेब्रुवारी रोजी हमाल माथाडी कामगारांनी मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियनच्या माध्यमातून लाक्षणिक संप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : हमाल, माथाडी कामगारांना पेन्शन व सामाजिक सुरक्षा देणारा केंद्रीय कायदा मंजूर करावा, यासह इतर अनेक मागण्यांसाठी १८ फेब्रुवारी रोजी हमाल माथाडी कामगारांनी मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियनच्या माध्यमातून लाक्षणिक संप करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़
कॉ़ राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळपासूनच हे आंदोलन करण्यात आले़ परभणी शहरासह जिल्ह्यातील हमाल, माथाडी कामगार मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते़ यावेळी कॉ़ क्षीरसागर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले़ हमाल माथाडी कामगारांना पेन्शन व सुरक्षा देणारा केंद्रीय कायदा करावा, ही मागणी सातत्याने केली जात असताना अद्याप मंजुरी देण्यात आली नाही़ मात्र कोणत्याही सामाजिक संघटनेने कधीही मागणी न केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करून भाजप सरकारने देशातील श्रमिक आणि गरीब घटकांच्या नागरिकत्व अधिकारावर आघात केला आहे़ त्याला विरोध करण्यासाठी आॅल इंडिया लोडींग, अनलोडींग वर्कर्स फेडरेशनच्या वतीने हे आंदोलन केले जात आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले़ आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले़ त्यामध्ये सीएए, एनपीआर, एनआरसी कायदा रद्द करावा, माथाडी मंडळाकडील प्रोव्हिडंट फंड केंद्र शासनाकडे जमा करण्याचा निर्णय रद्द करावा, परभणी, हिंगोली माथाडी मंडळासह सर्व माथाडी मंडळाची लेवी ३० टक्क्यांवरून ४० टक्के करावी, शासकीय धान्य गोदामातील हमाल माथाडी कामगारांची महागाई भत्त्यांची थकीत बिले अदा करावीत, परभणी येथील माथाडी मंडळास पूर्ण वेळ कामगार अधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशा बारा मागण्या करण्यात आल्या आहेत़ या प्रसंगी कॉ़ राजन क्षीरसागर, संघटनेचे अध्यक्ष शेख अब्दुल यांच्यासह कामगार बहुसंख्येने उपस्थित होते़