परभणी : सहा केंद्रांवर साडेपाच क्विंटल प्लास्टिक जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:39 AM2019-10-06T00:39:13+5:302019-10-06T00:39:43+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांमध्ये जवळपास साडेपाच क्विंटल प्लास्टिक या केंद्रावर जमा झाल्याची माहिती मनपाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांमध्ये जवळपास साडेपाच क्विंटल प्लास्टिक या केंद्रावर जमा झाल्याची माहिती मनपाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी दिली़
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने प्लास्टिक बंदी घोषित केली आहे़ त्यामुळे शहरात स्वच्छतेबरोबरच प्लास्टिकमुक्त शहर ही चळवळ राबविली जात आहे़ २ आॅक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून प्लास्टिक बंदीची जनजागृती केली़
प्लास्टिकच्या वापराने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत़ त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तू वापरणे टाळावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले़ आयुक्त रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये प्लास्टिक मुक्तीची चळवळ राबविली जात आहे़ या अंतर्गत गंगाखेड नाका, गणपती मंदिर, नटराज रंग मंदिर, गांधी पार्क, कारेगाव रोडवरील उघडा महादेव मंदिर आणि वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात प्लास्टिक संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे़ या केंद्रामध्ये तीन दिवसांत साडेपाच क्विंटल प्लास्टिक जमा झाले असल्याची माहिती मिळाली़ घरातील टाकाऊ प्लास्टिकचा कचरा संकलन केंद्रात जमा करून घेतला जात आहे़
रस्त्यासाठी होणार वापर
परभणी शहरात जमा झालेले सर्व प्लास्टिक रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणार आहे़ डांबरी रस्त्यांचे आयुष्यमान वाढावे, या उद्देशाने मागील काही महिन्यांपासून रस्ता कामात प्लास्टिकचा वापर होत आहे़ तेव्हा शहरातील जमा झालेला प्लास्टिकचा कचरा रस्त्याच्या कामासाठी दिला जाणार आहे़