परभणी: तीन वाळू घाटांचीच १०० टक्के रक्कम जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:08 AM2019-03-23T00:08:31+5:302019-03-23T00:09:03+5:30

जिल्ह्यातील लिलाव झालेल्या ११ वाळू घाटांपैकी केवळ ३ कंत्राटदारांनी आतापर्यंत १०० टक्के रक्कम जमा केली असून उर्वरित कंत्राटदारांकडून रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला ११ पैकी केवळ ३ घाटांच्या वाळू उपस्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Parbhani: deposits of 100 sand deposits of three sand ghats | परभणी: तीन वाळू घाटांचीच १०० टक्के रक्कम जमा

परभणी: तीन वाळू घाटांचीच १०० टक्के रक्कम जमा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील लिलाव झालेल्या ११ वाळू घाटांपैकी केवळ ३ कंत्राटदारांनी आतापर्यंत १०० टक्के रक्कम जमा केली असून उर्वरित कंत्राटदारांकडून रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला ११ पैकी केवळ ३ घाटांच्या वाळू उपस्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
दोन वर्षांपासून वाळूची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने वाळू घाटांचे लिलाव आणि खुल्या बाजारात वाळू कधी उपलब्ध होते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले होते. अनेक अडथळे पार करुन मागील महिन्यात लिलावाची प्रक्रिया पार पडली. ११ घाटांचे लिलावही पूर्ण झाले. त्यामुळे या घाटांमधून आता वाळूचा उपसा होईल, अशी अपेक्षा होती; परंतु, शुक्रवारपर्यंत केवळ ३ कंत्राटदारांनी घाटाची १०० टक्के रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा केली आहे. वाळू घाटाची रक्कम जमा करण्यासाठी २९ मार्चपर्यंतची मुदत असल्याने आणखी एक आठवडा कंत्राटदारांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर १०० टक्के रक्कम भरलेल्या कंत्राटदारांना वाळूघाटाचा ताबा देणे आणि वाहतूक पास दिले जातील. त्यानंतरच प्रत्यक्षात वाळू उपस्याला सुरुवात होणार आहे.
घाटांच्या लिलावा दरम्यान कंत्राटदारांकडून वाळू घाटाच्या एकूण रक्कमेच्या २५ टक्के रक्कम सुरुवातीलाच भरुन घेण्यात आली आहे. उर्वरित ७५ टक्के रक्कम लिलाव झाल्यानंतर भरुन घेतल्या जाते. सद्यस्थितीत मानवत तालुक्यातील पार्डी येथील वाळूघाट १२ लाख ४० हजार ५२० रुपयांना सुटला असून या कंत्राटदाराने संपूर्ण रक्कम जमा केली आहे. तसेच याच तालुक्यातील कुंभारी येथील वाळूचा घाट ६० लाख ६२ हजार ६०० रूपयांना सुटला आहे.
या घाटाच्या कंत्राटदारालाही बोलीच्या ७५ टक्के असलेली ४५ लाख ४६ हजार ९५० रुपये रक्कम जिल्हा प्रशानाकडे जमा केली आहे. तसेच गंगाखेड येथील चिंचटाकळी वाळूघाटाचा लिलाव ६१ लाख १ हजार १०० रुपयांना झाला असून या कंत्राटदारानेही ७५ टक्के प्रमाणे १२ लाख ११ हजार ८९० रुपये प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यामुळे सोमवारपर्यंत या तीन घाटांचा ताबा कंत्राटदाराला देऊन वाळू उपस्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात झालेल्या लिलावामध्ये पालम तालुक्यातील गुंज, रावराजूर, मानवत तालुक्यातील वांगी, पाथरी तालुक्यातील मुद्गल, सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा, डिग्रस ख., पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या, गंगाखेड तालुक्यातील दुसलगाव या वाळूघाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे. मात्र लिलावानंतर कंत्राटदारांनी अद्याप ७५ टक्के रक्कम जमा केली नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या कंत्राटारांनी रक्कम अदा केल्यासच अधिकृत वाळू उपस्याला सुरुवात होणार आहे.
वाळूचे भाव कमी होण्याची शक्यता
४सध्या खुल्या बाजारामध्ये वाळू उपलब्ध नसल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत. २५ हजार रुपयांना ट्रक या प्रमाणे काळ्या बाजारात वाळूची विक्री होत आहे. ११ वाळू घाटांमधून वाळूचा अधिकृत उपसा झाल्यानंतर हे भाव कमी होतील, अशी बांधकाम व्यावसायिक व नागरिकांना अपेक्षा आहे. सध्या तरी वाळू महागल्याने जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय ठप्प पडला आहे. या व्यावसायातील कारागिरांना काम उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. तर शासनाचे घरकुल योजनेचे अनुदान मिळूनही वाळूअभावी बांधकामे ठप्प आहेत. खुल्या बाजारात वाळू उपलब्ध झाल्यानंतर हे सर्व प्रश्न सुटणार आहेत.
१८ कोटींचा महसूल जमा
४जिल्हा प्रशासनाने सुरुवातीलाच घाटाच्या किंमतीच्या २५ टक्के रक्कम जमा करुन घेतली आहे. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेतून १८ कोटी ११ लाख ११ हजार ४५५ रुपये जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामध्ये पार्डी ३ लाख १० हजार १३०, गुंज १६ लाख २२ हजार ७५०, रावराजूर २५ लाख ४८ हजार ७५०, कुंभारी १५ लाख १५ हजार ६५०, वांगी २८ लाख ५१ हजार ६३७, मुद्गल २८ लाख २९ हजार ६०७, काजळी रोहिणा ८ लाख ८२ हजार ७६०, धानोरा मोत्या २० लाख २५ हजार, चिंचटाकळी १५ लाख २५ हजार २७५, दुसलगाव १६ लाख २१ हजार १४६ आणि डिग्रस वाळू घाटाच्या लिलावापोटी ३ लाख ७८ हजार ७५० रुपये प्रशासनाच्या तिजोरीत जमा आहेत.
आणखी १८ घाटांची लिलाव प्रक्रिया
४जिल्हा प्रशासनाने आणखी १८ वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला १८ मार्चपासून सुरुवात केली असून २६ मार्च रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत. २८ मार्च रोजी प्रत्यक्ष लिलाव केला जाणार आहे. या १८ वाळूघाटांमध्ये पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव सारंगी, पेनुर -१, पेनुर -२, कळगाव, बाणेगाव, खरबडा-२, मुंबर, वझूर, गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला, महातपुरी, भांबरवाडी, सोनपेठ तालुक्यातील खडका, लोहीग्राम, पाथरी तालुक्यातील लिंबा, मानवत तालुक्यातील सावंगी मगर, थार, सेलू तालुक्यातील सोन्ना, परभणी तालुक्यातील अंगलगाव या घाटांचा समावेश आहे.

Web Title: Parbhani: deposits of 100 sand deposits of three sand ghats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.