परभणी : देशमुख-बाजोरियांमध्येच खरी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:01 AM2018-05-08T00:01:54+5:302018-05-08T00:01:54+5:30
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीने विप्लव बाजोरिया यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीने विप्लव बाजोरिया यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ३ मे पर्यंत ५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ७ मे पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधितांना उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत होती. त्यानुसार सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत काँग्रेसचे माजी आ.सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख तसेच काही महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेले डॉ.प्रफुल्ल पाटील यांनी उमेदवारी अर्ज परत घेतले. याशिवाय काही महिन्यांपूर्वीच भाजपामध्ये दाखल झालेले सुरेश नागरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, दुपारी ३ वाजेपर्यंत ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचू शकले नाहीत. ३.०७ वाजता ते जिल्हाकचेरीत पोहचले. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज परत घ्यायचा असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिव शंकर यांना सांगितले; परंतु, उमेदवारी परत घेण्याची वेळ संपल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना वेळ झाल्याने आता अर्ज परत घेता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे नागरे परतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण जालना येथे काही कामानिमित्ताने गेलो होतो, मध्येच वाहतुकीचा खोळंबा झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात वेळेत पोहचू शकलो नाही. त्यामुळे वेळेत अर्ज परत घेता आला नाही, असे ते म्हणाले. निवडणुकीतील प्रचाराच्या रणनितीबाबत मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे आता या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख, शिवसेना- भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया आणि अपक्ष सुरेश नागरे अशा तीन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र आघाडीचे देशमुख व युतीचे बाजोरिया यांच्यातच खरी लढत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आघाडीचे सुरेश देशमुख यांच्याकडे काँग्रेस- राष्ट्रवादीचे एकूण २९७ सदस्य संख्याबळ आहे. देशमुख यांनी मात्र आपल्याकडे ३१७ सदस्यांचे संख्याबळ असल्याचे सांगितले. याशिवाय इतर पक्षांमध्येही आपले जवळचे मित्र आहेत. त्यांचीही मदत मिळू शकते, असेही ते म्हणाले. दुसरीकडे शिवसेना- भाजपाचे १४८ सदस्यांचे अधिकृत संख्याबळ आहे. या संख्याबळाबरोबरच इतर सदस्यांची मोट बांधून पहिल्यांदाच मतदारसंघ युतीच्या ताब्यात घेण्याचा बाजोरिया यांचा खटाटोप आहे. या मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी व शिवसेना- भाजपा व्यतिरिक्त २२ अपक्ष, जनशक्ती आघाडीचे १५, रासपचे ७, घनदाट मित्र मंडळाचे ७, मनसेचे ५ व एमआयएमचा १ असे एकूण ५७ इतर सदस्य आहेत. हे ५७ सदस्य आघाडी- युतीमध्ये विभागले जाण्याची शक्यता आहे.
माजी आ.सुरेश देशमुख हे दुसºयांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर बाजोरिया हे पहिल्यांदाच निवडणूक लढवित असले तरी त्यांचे वडील आ.गोपीकिशन बाजोरिया यांना राजकारणाचा गाढा अनुभव आहे. विशेषत: मतांची जुळवाजुळव करण्यात ते माहीर असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे देशमुख यांचेही सर्व पक्षात मित्र असल्याने ही लढत कशी होईल, याकडे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.
सुरेश नागरेंची बंडखोरी चकित करणारी
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना- भाजपाची युती असून परभणीतही युतीच्या नेत्यांनी एकत्रितच विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी सुरेश नागरे यांनी बरेच प्रयत्न चालविले होते. यासाठी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. परंतु, शिवसेना- भाजपा युतीच्या चर्चेत परभणीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. त्यानंतरही नागरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी परत घेण्यासाठी ५ व ७ मे असा दोन दिवसांचा कालावधी होता. या दोन दिवसांमध्ये ते ठरलेल्या वेळेत उमेदवारी अर्ज परत घेऊ शकले असते.परंतु, तसे न होता त्यांनी वेळ निघून गेल्यानंतर उमेदवारी परत घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सहाजीकच जिल्हाधिकाºयांनी वेळ संपल्याचे सांगून त्यांना परत पाठविले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नागरे यांच्या चेहºयावर उमेदवारी असल्याचा कुठल्याही प्रकारणाचा तणाव नव्हता. उलट हास्य संवाद करीत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामुळे नागरे यांना उमेदवारी अर्ज परत घेण्यास खरोखरच उशीर झाला की जाणूनबुजून उशीर केला गेला, अशी चर्चा आता राजकीय वर्तूळात होताना दिसून येत आहे. असे असेल तर नागरे यांचा बोलविता धनी कोण आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
नागरे यांचा भाजपाशी संबंध नाही -अभय चाटे
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेना -भाजपाची युती आहे. विप्लव बाजोरिया हेच युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. सुरेश नागरे यांचा भाजपाशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
नागरेंबाबत भाजपाने निर्णय घ्यावा -बंडू जाधव
शिवसेना- भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया हेच उमेदवार आहेत. शिवाय मतदारसंघात यावेळी परिवर्तन घडणार आहे. भाजपाचे सुरेश नागरे यांनी बंडखोरी का केली, याबाबतची आपणास माहिती नाही. या संदर्भात योग्य तो निर्णय भाजपाने घ्यावा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांनी दिली.