परभणी : ६५ गावांच्या नशिबी दुष्काळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:35 AM2019-05-19T00:35:47+5:302019-05-19T00:36:16+5:30

गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर्षापासून टंचाईच्या गर्तेत असलेल्या या गावांसाठी ठोस उपाययोजना करावी, यासाठी आता ग्रामस्थांनी ६५ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.

Parbhani: Destruction of 65 villages | परभणी : ६५ गावांच्या नशिबी दुष्काळच

परभणी : ६५ गावांच्या नशिबी दुष्काळच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गोदावरी खोरे, जायकवाडी प्रकल्प आणि निम्न दुधना प्रकल्प अशा तिन्ही प्रकल्पांच्या लाभापासून मानवत आणि परभणी तालुक्यातील सुमारे ६५ गावे वंचित असून या तिन्ही प्रकल्पांचे पाणी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कायमचा दुष्काळ या गावांच्या नशिबी आला आहे. वर्षानुवर्षापासून टंचाईच्या गर्तेत असलेल्या या गावांसाठी ठोस उपाययोजना करावी, यासाठी आता ग्रामस्थांनी ६५ गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.
मानवत तालुक्यातील मानोली ते परभणी तालुक्यातील नांदगाव या पट्ट्यामध्ये एकाही प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ ग्रामस्थांना मिळत नाही. जायकवाडीचा कालवा असो अथवा निम्न दुधना प्रकल्पाचा कालवा, या गावांच्या शेजारुन गेला; मात्र गावापर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे स्वातंत्र्यापासून दुष्काळाच्या झळा येथील ग्रामस्थ सहन करीत आहेत. या ६५ गावांच्या शिवारात प्रत्येक गावातील १ हजार हेक्टर जमीन अशी सुमारे ६५ हजार हेक्टर जमीन सिंचनापासून दूर आहे. स्थानिक पातळीवर भूजल स्त्रोत निर्माण करुन गावकरी पिके घेतात. मात्र प्रकल्पाच्या पाण्याचा वाटा ग्रामस्थांपर्यंत पोहचलेला नाही. त्यामुळे आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागते. तिन्ही प्रकल्पांतील मध्यभाग असलेल्या या गावांमध्ये आता मागील काही दिवसांपासून जनजागृती करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपले ठराव तयार केले असून जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. साधारणत: २००९ पासून गावकऱ्यांना एकत्रित करीत पाठपुरावा केला जात आहे. हा प्रश्न मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांपर्यंतही पोहोचला आहे; परंतु, अद्यापपर्यंत या ठिकाणी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे अजूनही ग्रामस्थांचा संघर्ष सुरु आहे. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बाराही महिने विहिरींचे पाणी तळाला असते. यासाठी आता ६५ गाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावा-गावात जनजागरण केले जात असून लवकरच ग्रामस्थ समितीच्या माध्यमातून आंदोलनाच्या तयारीत आहेत.
काय केल्यास मिटेल प्रश्न ?
या ६५ गावातील पाण्याच्या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात राबविलेल्या उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर बंधाºयातून किंवा जायकवाडी प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्पातून उपसा जलसिंचन प्रकल्प हाती घेतल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. परभणी तालुक्यातील पेडगाव किंवा मानवत तालुक्यातील आंबेगाव पाझर तलावात निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोडल्यास या भागातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटू शकतो, असे ६५ गाव संघर्ष समितीचे बाळासाहेब भालेराव यांनी सांगितले.
ही आहेत कायम दुष्काळी गावे
परभणी तालुका- आळंद, मांडाखळी, मोहपुरी, गव्हा, पान्हेरा, पेडगाव, जांब, सोन्ना, बाभूळगाव, पारवा, उजळंबा, उमरी, नरसापूर, डफवाडी, नागापूर, ब्राह्मणगाव, कौडगाव, भोगाव, हसनापूर, तुळजापूर, शहापूर, टाकळी कुंभकर्ण, धर्मापुरी, धारणगाव, साटला, हिंगला, समसापूर, सनपुरी, करडगाव, धार, दुर्डी, साबा, मुरुंबा, नांदगाव, राहटी. मानवत तालुका: पिंपळा, पाळोदी, मांडेवडगाव, जंगमवाडी, सावरगाव, सावळी, आंबेगाव, देवलगाव, हत्तलवाडी, बोंदरवाडी, खडकवाडी, नागरजवळा, खरबा, करंजी, रुढी, मानवत रोड, कोल्हा, कोल्हावाडी, ताडबोरगाव, इठलापूर, मानोली या गावांचा दुष्काळी गावांत समावेश आहे.

Web Title: Parbhani: Destruction of 65 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.