परभणी :चार दिवसांपासून धर्मापुरी गाव अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:21 AM2017-12-31T00:21:32+5:302017-12-31T00:21:43+5:30
थकबाकीच्या नावाखाली महावितरणने धर्मापुरी गावाचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ परिणामी अख्खे गाव चार दिवसांपासून अंधारात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : थकबाकीच्या नावाखाली महावितरणने धर्मापुरी गावाचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ परिणामी अख्खे गाव चार दिवसांपासून अंधारात आहे़
धर्मापुरी या गावात साधारणत: ३०० विद्युत ग्राहक आहेत़ त्यापैकी निम्मे ग्राहक नियमित वीज बिलाचा भरणा करतात़ त्यामुळे महावितरणने केवळ थकबाकीदारांचाच वीज पुरवठा खंडित करण्याऐवजी अख्ख्या गावाचीच वीज बंद केली आहे़ चार दिवसांपासून गावात वीज नसल्याने दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत़ पिठाच्या गिरण्या, पाण्याच्या मोटारी बंद असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ महावितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण गावास वेठीस धरले जात आहे़, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. अगोदरच भारनियमनाच्या नावाखाली अनियमित वीजपुरवठ्याने हैराण असलेले ग्रामस्थ या कारवाईमुळे संतप्त झाले आहेत़ या संदर्भात महावितरणच्या अभियंत्यांना विचारणा केली असता, वसुली झाल्याशिवाय वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले़ महावितरणने थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यास हरकत नाही़ मात्र संपूर्ण गावाचाच वीजपुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे़