परभणी : इमारत हस्तांतरित होत नसल्याने अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:46 PM2019-06-17T23:46:09+5:302019-06-17T23:47:15+5:30
जायकवाडी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेत उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू असून ही इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुुरुस्त करण्याची आवश्यकता असतांना या इमारतीचे शासकीय बांधकाम विभागाकडे हस्तांतरण झाले नसल्याने दुरुस्ती कोणी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : जायकवाडी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेत उपजिल्हाधिकारी कार्यालय सुरू असून ही इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुुरुस्त करण्याची आवश्यकता असतांना या इमारतीचे शासकीय बांधकाम विभागाकडे हस्तांतरण झाले नसल्याने दुरुस्ती कोणी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाथरी शहरातील कारखाना परिसरात जायकवाडी विभागाची जुनी इमारत आहे. पूर्वी या इमारतीमध्ये जायकवाडीचे विश्रामगृह सुरू होते. कालांतराने ही इमारत ग्रामीण रुग्णालयाच्या वापरासाठी देण्यात आली. त्यानंतर पाथरी शहरात ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन स्वतंत्र इमारत तयार झाल्यानंतर हे रुग्णालय स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे ही विश्रामगृहाची इमारत रिकामी झाली. २०१३ मध्ये पाथरी, मानवत व सोनपेठ या तीन तालुक्यांसाठी उपविभागीय कार्यालयास मंजुरी मिळाली; परंतु, जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर जायकवाडी विभागाने १४ आॅक्टोबर २०१३ रोजी ही इमारत उपविभागीय कार्यालय पाथरी यांना हस्तांतरित केली. सध्या ही ४० वर्षाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. तरी सुद्धा या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वित आहे. धोकादायक इमारत दुरुस्त करण्यात यावी, यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी पत्र देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली होती. मात्र जायकवाडी विभागाकडील ही इमारत बांधकाम विभागाकडे अद्यापही स्थलांतरित झाली नाही. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
पावसाळ्यात धोका शक्य
च्जायकवाडी विभागाच्या अख्यत्यारीत असलेल्या जुन्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीत सुरू असलेल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ३ एकर परिसरात विस्तारलेली आहे.
च्मात्र या इमारतीचे बांधकाम होऊन जवळपास ४० वर्षे उटले आहेत. त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली आहे. अनेक ठिकाणी छताचे प्लास्टर निखळून पडले आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात या इमारतीतून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.