परभणीत घाण पाणी वसाहतीमध्ये शिरल्याने संतप्त नागरिकांनी सार्वजनिक शौचालयास ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 04:34 PM2018-01-15T16:34:12+5:302018-01-15T16:45:55+5:30
शहरातील खंडोबा बाजार परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या आऊटलेटचे पाणी वसाहतीमध्ये येत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या शौचालयाला चक्क कुलूप ठोकले.
परभणी : शहरातील खंडोबा बाजार परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या आऊटलेटचे पाणी वसाहतीमध्ये येत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या शौचालयाला चक्क कुलूप ठोकले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने शहरात विविध भागात सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली. यातूनच शांतीदूतनगर खंडोबा बाजार परिसरातही सार्वजनिक स्वच्छतागृहाची बांधणी करण्यात आली. मात्र या शौचालयाचे आऊटलेट याच परिसरात असलेल्या मैदानात सोडण्यात आले. त्यामुळे शौचालयातील घाण पाणी मैदानाशेजारी असलेल्या वसाहतीत घुसून परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, ११ जानेवारीस राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर शाखेने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन आऊटलेटच्या पाण्याचा पर्यायी बंदोबस्त करावा, अशी मागणी शहर जिल्हाध्यक्षा नंदाताई राठोड, गंगासागर वाळवंटे, सुमित्रा लझडे आदींनी केली होती. शौचालयातील आऊटलेटच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे, असेही निवेदनात नमूद केले होते. मात्र मनपाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे १५ जानेवारी रोजी सकाळी परिसरातील महिला व नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाला कुलूप ठोकले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.