परभणी :प्रशासकीय इमारतीत अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:38 AM2018-10-29T00:38:54+5:302018-10-29T00:40:38+5:30
लाखो रुपयांचा खर्च करून एकीकडे स्वच्छतेच्या योजना राबवित स्वच्छतेचा संदेश जिल्हाभर पोहचविणाऱ्या प्रशासनातील कार्यालयीन इमारतींचीच दुरवस्था झाली आहे़ येथील प्रशासकीय इमारतीत मोठ्या प्रमाणात धूळ, जाळे, जळमटे झाल्याने स्वच्छतेचा संदेश नेमका कोणासाठी? असा प्रश्न निर्माण होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लाखो रुपयांचा खर्च करून एकीकडे स्वच्छतेच्या योजना राबवित स्वच्छतेचा संदेश जिल्हाभर पोहचविणाऱ्या प्रशासनातील कार्यालयीन इमारतींचीच दुरवस्था झाली आहे़ येथील प्रशासकीय इमारतीत मोठ्या प्रमाणात धूळ, जाळे, जळमटे झाल्याने स्वच्छतेचा संदेश नेमका कोणासाठी? असा प्रश्न निर्माण होत आहे़
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात मोठा गाजावाजा करून स्वच्छता अभियान राबविले जात आहे़ स्वच्छ खेडी, स्वच्छ शहर अभियानातून हातात फलक घेऊन आणि आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाषणे देऊन अधिकारी स्वच्छतेचा संदेश देत आहेत़; परंतु, स्वत:च्या अंगणातच अस्वच्छता असल्याचे पहावयास मिळत आहे़
परभणी येथील प्रशसकीय इमारत परिसर अस्वच्छतेने माखला आहे़ या इमारतीमध्ये जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनातील विविध कार्यालयांचे कामकाज चालतात़ परभणी जिल्ह्यातून सर्वाधिक महसूल देणारे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय, ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा करणारे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पशूसंवर्धन कार्यालय, जिल्ह्यातील जमिनींच्या खरेदी खताची नोंदणी करणारे मुद्रांक जिल्हाधिकाºयांचे कार्यालय जिल्ह्यातील जमिनींची मोजमाप करणारे भूमीअभिलेख कार्यालय, लोकसंख्या, जातनिहाय गणना आणि जिल्ह्याची सांख्यिकी माहिती ठेवणारे सांख्यिकी अधिकाºयांचे कार्यालय, भूजल पातळीची नोंद घेणारे जिल्हा भूजल सर्वेक्षण विभाग, समाजातील विविध घटकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कर्ज पुरवठा करणारे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय आणि या सर्व कार्यालयांची व शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी असणारे जिल्हा माहिती अधिकाºयांचे कार्यालय असे एकाहून एक महत्त्वाचे कार्यालय असलेला हा परिसर मात्र अस्वच्छ आहे़ जिल्हाभरात स्वच्छतेचे संदेश प्रशासनाकडून दिले जात असताना प्रशासकीय इमारतीत मात्र अनेक वर्षांपासून स्वच्छता झाली नसल्याचे दिसते़
प्रशासकीय इमारत परिसर हा संपूर्णत: अस्वच्छ परिसर असून, मुख्य प्रवेशद्वारापासूनच अस्वच्छतेला सुरुवात होते़ प्रवेशद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर जिन्याखाली मोठ्या प्रमाणात खाटपसरा टाकला आहे़ सिमेंटचे पोते, तुटलेल्या फरशा याच ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत़ जिना चढताना प्रत्येक पायरीवर धूळ साचली असून, या परिसराला एकदाही झाडूचे दर्शन झाले की नाही? असा प्रश्न निर्माण होतो़ इमारतीतील प्रत्येक कोपºयाने कचºयाची जागा घेतली आहे़ या इमारतीतील कार्यालयांमधील अंतर्गत स्वच्छता तेवढी होते आणि कार्यालयातील निघालेला कचरा इमारतीच्या कोपºयांमध्येच टाकला जातो़
जागोजागी विजेची वायरिंग लोंबकळत आहे़ त्यामुळे विजेचा झटका लागून दुर्घटना घडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे़ प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेकडे वर्षानुवर्षापासून कानाडोळा झाल्याने परभणीतच स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला असल्याचे दिसत आहे़ जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भाने निर्णय घेणाºया या प्रशासकीय कार्यालयांमध्येच अशी अवस्था असेल तर स्वच्छता अभियान यशस्वी झाले हे कशावरून? असा प्रश्नही निर्माण होत आहे़ जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन प्रशासकीय इमारतीच्या स्वच्छतेसाठीही पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे़
पिचकाºयांनी रंगले कोपरे
४प्रशासकीय इमारत परिसरामध्ये अनेक कार्यालये असले तरी समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत आहे़ त्यामुळे या इमारतीत वावरताना नागरिकांना आणि कर्मचाºयांनाही कोणतेही सार्वजनिक शिस्तीचे बंधन नाही़ त्यामुळेच इमारतीचा प्रत्येक कोपरा पान आणि गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाºयांनी रंगलेला दिसतो़ या परिसरामध्ये सुरक्षारक्षक अथवा सेवकांनाही जबाबदारी दिलेली नसल्याने सर्रासपणे अस्वच्छता केली जाते़ त्यावर कोणतेही बंधन टाकले जात नाही़ त्यामुळे दिवसेंदिवस या परिसराची अस्वच्छता वाढत चालली आहे़
रस्त्यांचेही खस्ता हाल
४प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश करणाºया दोन्ही बाजुंच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे़ गुडघ्या इतके खड्डे आणि त्या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतो़ मागील अनेक वर्षांपासून ही परिस्थिती निर्माण झाली आहे़ परंतु, प्रशासकीय इमारतीत जाणारा साधा रस्ताही तयार करण्याचे कष्ट घेण्यात आले नाहीत़ या इमारत परिसरात लाखो रुपयांचा खर्च करून टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत़ त्याही मागील काही महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत़ त्यामुळे प्रशासकीय इमारतीचे वैभव वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे़
बगीचामध्ये फुलझाडांऐवजी गाजरगवत
४हा परिसर सुशोभित व्हावा, या उदात्त हेतुने इमारतीच्या समोर कठडे बांधून बगीचा तयार करण्यात आला आहे़ या बगीचात कोणे एकेकाळी लावलेली झाडे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत़ बगीचाच्या सुशोभिकरणासाठी कोणाचेही लक्ष नसल्याने या झाडांबरोबरच मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे़ विशेष म्हणजे, बगीचासाठी सुरक्षा म्हणून एक गेटही बसविण्यात आले़; परंतु, स्वच्छता करायलाच कोणी तयार होत नसल्याने या बगीचात फुलझाडांऐवजी गाजर गवताचे वास्तव्य झाले आहे़