परभणी : डॉक्टरांअभावी दवाखाना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:47 PM2019-03-23T23:47:08+5:302019-03-23T23:47:37+5:30
गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रेणी-२ मधील पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी करण्यात आली; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दवाखान्याकडे डॉक्टर फिरकत नसल्याने आठवड्यातून दोन ते चार दिवस हा दवाखाना बंद राहत आहे. परिणामी पशुपालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारासूर (परभणी): गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रेणी-२ मधील पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी करण्यात आली; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दवाखान्याकडे डॉक्टर फिरकत नसल्याने आठवड्यातून दोन ते चार दिवस हा दवाखाना बंद राहत आहे. परिणामी पशुपालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
धारासूर येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्यात औषधोपचारासाठी ९ ते १० खेड्यांचे पशुपालक आपल्या पशूंना घेऊन येतात; परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दवाखान्यात डॉक्टर फिरकत नसल्याने दवाखान्याला कुलूप राहत आहे. डॉक्टर गैरहजर राहत असल्या प्रकरणी पशुपालकांनी अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र वरिष्ठांकडून कोणतीच पाऊले उचलली जात नसल्याने डॉक्टरांचे मनोबल उंचावत आहे. १८ मार्च रोजी धारासूर व परिसरातील पाच ते सहा गावातील पशुपालक आपल्या पशूंना घेऊन दवाखान्यात आले. मात्र रोजच्या प्रमाणे सोमवारीही डॉक्टर गैरहजर राहिल्याने या दवाखान्याला कुलूप होते.
परिणामी पशुपालक आल्या पावली परत गेले. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने याकडे लक्ष देऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.