परभणी : गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:44 AM2018-05-28T00:44:21+5:302018-05-28T00:44:21+5:30
परभणी रेल्वेस्थानकावरून धावणारी निजामाबाद-पंढरपूर ही रेल्वे गाडी एक महिन्यासाठी रद्द केल्याने पंढरपूरसह परळी, गंगाखेडकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी रेल्वेस्थानकावरून धावणारी निजामाबाद-पंढरपूर ही रेल्वे गाडी एक महिन्यासाठी रद्द केल्याने पंढरपूरसह परळी, गंगाखेडकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे़
पंढरपूरजवळ रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने निजामाबाद-पंढरपूर या रेल्वेगाडीबरोबरच निजामाबाद-पुणे, नांदेड-दौंड या गाड्या एक महिन्यासाठी बंद केल्या आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे़ सध्या अधिकमास सुरू असून, या काळात पंढरपूरला जाणाºया भाविकांची संख्या वाढते़ त्याचबरोबरच उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना आधीच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे़ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या वाढविण्याऐवजी गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे़ गाड्या रद्द करण्याऐवजी गाड्यांच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी वारंवार केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़
रविवारी सायंकाळच्या सुमारास परभणी रेल्वेस्थानकावर पंढरपूरला जाण्यासाठी अनेक प्रवासी परभणी येथील रेल्वेस्थानकावर दाखल झाले होते़ ग्रामीण भागातील या प्रवाशांना रेल्वे गाडी रद्द झाली असल्याची माहिती नव्हती़ मात्र रेल्वेची वेळ झाल्यानंतर ही रेल्वे रद्द असल्याची घोषणा करण्यात आल्याने या प्रवाशांना रेल्वे ऐवजी पर्यायी वाहनाने पंढरपूरकडे रवाना व्हावे लागले़ अधिकमास असल्याने पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भाविक जात आहेत़ मात्र रेल्वे रद्द झाल्याने या प्रवाशांची हेळसांड होत आहे़