परभणी :पेट्रोल पंपावरील फसवणूक अन् रेतीवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:29 AM2018-04-03T00:29:30+5:302018-04-03T00:29:30+5:30
जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर ग्राहकांची केली जात असलेली फसवणूक आणि अवैधरित्या रेतीची होत असलेली राजरोस विक्री या विषयावर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपावर ग्राहकांची केली जात असलेली फसवणूक आणि अवैधरित्या रेतीची होत असलेली राजरोस विक्री या विषयावर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक झाली. प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा परिषदेचे निमंत्रक अंकुश पिनाटे यांनी मागील बैठकीतील मुद्यांचे वाचन करुन कार्यवाहीचा अहवाल सादर केला. प्रत्येक मुद्यांविषयी करण्यात आलेल्या कारवाईबाबतची माहिती जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली पाहिजे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. पाथरी, सोनपेठ तालुक्यात मिळणारी अवाजवी वीज देयके, पेट्रोल पंपावरील ग्राहकांची होणारी फसवणूक, अवैध रेतीची राजरोस विक्री, शैक्षणिक संस्थामधील प्रवेश आणि शुल्काबाबत विद्यार्थी व पालकांची होणारी गैरसोय, परवानाधारक व्यक्तीशिवाय होणारी औषध विक्री, एमआरपीपेक्षा जास्त दराने होणाºया वस्तुंची विक्री, बाटल्यांद्वारे होणारी पिण्याच्या पाण्याची विक्री आदी विषयांवरील माहिती या बैठकीत अशासकीय सदस्यांनी दिली. या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाºयांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. ग्राहकांनी आपल्या आरोग्याशी संबंधित असलेल्या औषधींची खरेदी करीत असताना आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे.
खरेदीची पावती घेणे आवश्यक असून त्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने जनतेमध्ये जागरुकता निर्माण करावी, अशी सूचनाही यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, सदस्य तसेच अशासकीय सदस्य बैठकीस उपस्थित होते.
एकाच रस्त्यावर २२ गतिरोधक
या बैठकीत परभणी शहरातील एकाच रस्त्यावर असलेल्या २२ गतिरोधकांचा विषय चर्चेला आला. यावेळी अशासकीय सदस्यांनी या गतिरोधकांमुळे वाहनधारकांना कसा त्रास होत आहे, याबाबत माहिती दिली. जेथे आवश्यक आहे, तेथे गतिरोधक बसवावेत. जेथे खरोखरच गतिरोधकाची आवश्यकता नाही, तेथील गतिरोधक काढावेत, अशीही सूचना यावेळी देण्यात आली. या संदर्भात मनपाच्या अधिकाºयांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.