परभणी : ११ बीएलओंना दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:15 AM2019-02-27T00:15:44+5:302019-02-27T00:16:12+5:30
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारी रोजी मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रावर गैरहजर आढळून आलेल्या ११ बीएलओंना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारी रोजी मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रावर गैरहजर आढळून आलेल्या ११ बीएलओंना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
निवडणूक आयोगाच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने सर्व बीएलओंना मतदान केंद्रावर हजर राहण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी आदेश दिले होते. तसेच राजकीय पक्षांनाही याबाबत अवगत करण्यात आले होते.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपविभागीय अधिकारी सूचिता शिंदे, परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर, विभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी यांनी २४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रांना भेटी दिल्या. त्यावेळी बाभळी येथील बीएलओ एस.एस.सुरवसे, पिंपरी येथील व्ही.आर. बोरसे, वरपूड येथील रणवीर मारोती, पिंपरी देशमुख येथील एस.ए. लोखंडे, के.एम. बनसोडे, ताडलिमला येथील एन.डी. कदम, पोरजवळा येथील एम.एम. काळे, पिंगळी येथील निलपत्रेवार, शेंद्रा येथील फुलारी, कासलवार, बलसा येथील बीएलओ सोनाजी गायकवाड हे ११ बुथलेव्हल एजंट गैरहजर आढळून आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी सर्व गैरहजर बीएलओंना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून तातडीने खुलासा मागवून घ्यावा, असे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आदेशित केले. तसेच गैरहजर बीएलओंवर कडक कारवाई करा, असेही आदेशित केले. यावेळी विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शनिवार, रविवार पुन्हा विशेष मोहीम
४मतदार नोंदणीसाठी २ व ३ मार्च रोजी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष नोंदणी मोहीम घेण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, हे तपासून घ्यावे. तसेच मतदार नोंदणीचा नमुना ६ अर्ज भरुन द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी केले आहे. विशेष मोहिमेच्या दिवशी सर्व मतदार केंद्रावर बीएलओ हजर राहणार आहेत.