परभणी: जि. प. अध्यक्षपदी विटेकर, उपाध्यक्षपदी चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:05 AM2020-01-08T00:05:19+5:302020-01-08T00:05:35+5:30
परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांची तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंगळवारी या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड घोषित करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणीजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांची तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंगळवारी या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड घोषित करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी ७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा वेळ होता. या वेळात अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून सोनपेठ तालुक्यातील शेळगाव गटाच्या जि.प. सदस्या निर्मलाताई विटेकर यांचा तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचेच जिंतूर तालुक्यातील बोरी जि.प. गटाचे सदस्य अजय चौधरी यांचेच अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल झाले. त्यानंतर दुपारी ३ वाजता या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सुचेता शिंदे यांनी अध्यक्षपदी विटेकर यांची तर उपध्यक्षपदी चौधरी यांची निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी जि.प.चे सीईओ बी.पी.पृथ्वीराज, अतिरिक्त सीईओ विजय मुळीक यांच्यासह मावळत्या जि.प.अध्यक्षा उर्मिलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांच्यासह विविध पक्षाच्या सदस्यांची उपस्थिती होती. निवडीनंतर नूतन अध्यक्षा विटेकर आणि उपाध्यक्ष चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, शिवसेनेचे आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपुडकर, माजी आ. विजय भांबळे, माजी खा.सुरेश जाधव, माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, माजी सभापती गणेश घाडगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम, माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ. विवेक नावंदर, भाजपाचे गणेश रोकडे , बांधकाम सभापती अशोक काकडे, प्रसाद बुधवंत, नानासाहेब राऊत, माणिकअप्पा घुंबरे, पंकज आंबेगावकर, बाळासाहेब घुगे , विठ्ठल सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन जोरदार जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निवडणूक प्रक्रियेतून विरोधी पक्षच झाला गायब
४जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे २४, शिवसेनेचे १३, काँग्रेसचे ६, भाजपाचे ५, रासप ३, घनदाट मित्र मंडळ १ आणि अपक्ष १ असे ५४ सदस्यांचे संख्याबळ आहे. राज्यातील महाविकास आघाडी जिल्हा परिषदेतही अस्तित्वात आली आहे. त्यामुळे या आघाडीचे एकूण ४३ सदस्य झाले आहेत. असे असले तरी बहुतांश सदस्य हे महाविकास आघाडीमध्येच असल्याने जि.प.पदाधिकारी निवडणुकीत विरोधी पक्षच राहिलेला नाही.
४विरोधी पक्षच अस्तित्वात नसलेली परभणी जि.प. कदाचित महाराष्ट्रातील पहिलीच जिल्हा परिषद असेल. त्यामुळे एकीकडे सत्ताधारी पक्ष मजबूत झाला असताना या सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षच नसल्याने जि.प.तील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवणार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
अजय चौधरी यांना लागली लॉटरी
४जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निर्मलाताई विटेकर यांची निवड होणार असल्याचे रविवारीच पाथरी झालेल्या सर्वपक्षीय सदस्यांच्या बैठकीत निश्चित झाले होते; परंतु उपाध्यक्षपदी कोणाची निवड होणार हे मात्र निश्चित नव्हते. शिवसेनेने उपाध्यक्षपदाची मागणी लावून धरली होती; परंतु या पक्षात मतभेद झाले. शिवाय अध्यक्षपद पाथरी मतदारसंघाला गेल्याने माजी आ. विजय भांबळे यांनी उपाध्यक्षपदावर प्रबळ दावा केला.
४चर्चेअंती हे पद जिंतूरला देण्याचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निश्चित झाले; परंतु या पदासाठी कोणाची निवड करावी, या नावावर एकमत होईना. जिंतूर मतदारसंघात या पदासाठी अनेक दिग्गज सदस्य स्पर्धेत होते. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास आ. बाबाजानी दुर्राणी, आ. डॉ. राहुल पाटील व माजी आ. विजय भांबळे यांच्या बैठकीत अचानकपणे भांबळे यांचे समर्थक अजय चौधरी यांचे नाव पुढे आले आणि त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करुन दुपारी एक वाजता त्यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला.
विटेकर कुटुंबातील निर्मलाताई तिसºया जि.प.अध्यक्षा
४जि.प.च्या अध्यक्षपदी निर्मलाताई विटेकर यांची निवड झाल्यानंतर एक अनोखा विक्रम विटेकर कुुटुंबियांच्या नावे नोंद झाला. निर्मलाताई विटेकर यांचे पती दिवंगत माजी आ.उत्तमराव आबाजी विटेकर हे ५ फेब्रुवारी १९९६ ते २० मार्च १९९७ या काळात जि.प.चे अध्यक्ष होते. निर्मलाताई यांचे चिरंजीव राजेश विटेकर हे २१ फेब्रुवारी २०१४ ते २० मार्च २०१७ या कालावधीत जि.प.चे अध्यक्ष होते आणि आता निर्मलाताई विटेकर या ७ जानेवारी २०२० रोजी जि.प.च्या अध्यक्षा झाल्या आहेत. एकाच कुटुंबात तिघांना जि.प.चे अध्यक्षपद मिळण्याचा दुर्मिळ योगायोग यानिमिताने आला आहे.
बाबाजानी दुर्राणी यांची मेहनत फळाला
४जिल्ह्यात मजबूत महाविकास आघाडीचा प्रयोग राबविताना इतर सर्व पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेऊन एकमताने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
४रविवारी पाथरीत त्यांनी सर्वपक्षीय सदस्यांना बैठकीला आमंत्रित करुन त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीतील इतर पदाधिकाºयांशी समन्वय साधून दोन्ही पदासाठी प्रत्येकी एका नावावर शिक्कामोर्तब घडून आणले. त्यामुळे मंगळवारी आ. दुर्राणी यांनी या निवडणूक प्रक्रियेसाठी घेतलेली मेहनत फळाला आल्याचे पहावयास मिळाले.
परभणी जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्र येवून एकमताने अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा घेतलेला निर्णय गौरवास्पद आहे. आता जि. प.त राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यास प्राधान्य राहणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शासनाकडून अधिकाधिक निधी आणून ग्रामीण भागाचा विकास करण्याचे ध्येय या माध्यमातून साध्य करणार आहोत.
- आ. बाबाजानी दुर्राणी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून सर्व सदस्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेत विकासाचे राजकारण करु. शिक्षण, आरोग्य, सिंचन आदी विषयांना न्याय देवून जि.प.च्या योजना सर्वसामान्य ग्रामस्थांपर्यंत कशा पोहोचतील, या दृष्टीकोनातून कामकाज करणार आहे.
- निर्मलाताई विटेकर, जि.प. अध्यक्षा
महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन जिल्हा परिषदेत घडले आहे. राज्याप्रमाणे जिल्हातही महाविकास आघाडी मजबूत राहणार आहे. येणाºया काळात जिल्हा परिषदेत सर्वांना सोबत घेऊन विकासाची कामे करण्याचा महाविकास आघाडीतील पक्षांचा कॉमन अजेंडा आहे. त्यानुसार जि.प.त आमची वाटचाल राहणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जि.प.च्या योजना जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने राबवू. शिवाय राज्य शासनाच्या योजनाही चांगल्या प्रकारे राबविण्यात येतील.
- आ.डॉ. राहुल पाटील, परभणी