परभणी जिल्ह्यात आठवडाभरात १२ लाख झाडे लावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:00 AM2019-07-08T00:00:15+5:302019-07-08T00:01:01+5:30
राज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७ दिवसांमध्ये जिल्ह्यात १२ लाख ३३ हजार झाडांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्य शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ७ दिवसांमध्ये जिल्ह्यात १२ लाख ३३ हजार झाडांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली़
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते़ यावर्षासाठी परभणी जिल्ह्याला १ कोटी १९ लाख ८ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांना हे उद्दिष्ट विभागून दिले असून, जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली आहे़ कृषी दिनानिमित्त जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात करण्यात आली़ परभणी शहरातील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर जिल्ह्यात ठिक ठिकाणी वृक्ष लागवडीला सुरुवात झाली आहे़ प्रत्येक ग्रामपंचायतींना वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ वन विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे़ मोहिमेसाठी लागणारी सर्व रोपे प्रशासनाने सज्ज ठेवली आहेत. सात दिवसांच्या कालावधीत वन विभागांतर्गत जिंतूर तालुक्यातील वनक्षेत्र, सार्वजनिक रस्त्यांच्या दुतर्फा, ग्रामपंचायत परिसरात झाडे लावण्यात आली आहेत़
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ६० हजार झाडे लावली आहेत़ जिंतूर आणि पूर्णा तालुक्यात ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे़
शाळा, महाविद्यालयांसह शासकीय आणि निमशासकीय संस्था, सामाजिक संस्था या मोहिमेसाठी पुढे सरसावल्या आहेत़ यावर्षी तीन महिने ही मोहीम चालणार असून, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांबरोबरच नागरिक प्रयत्न करीत आहेत़
मोहिमेत पावसाचा अडसर
१ जुलै रोजी वृक्ष लागवड मोहिमेला सुरुवात झाली असली तरी त्यानंतर जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झाला नाही़ पाऊस नसताना झाडे लावली तर ती वाळून जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे अनेक भागात वृक्ष लागवड मोहिमेचे नियोजन करण्यात आले़ पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे़
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत येणाºया ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डेन्स फॉरेस्ट विकसित केले जाणार आहे़ मात्र पाऊस नसल्याने ही प्रक्रिया थांबली आहे़ मोठा पाऊस झाल्यास या वृक्ष लागवड मोहिमेला गती मिळेल, असे विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी सांगितले़